मजबूत सिमेंट-काँक्रीट रस्त्यांसाठी अभियंत्यांना ‘आयआयटी’चे धडे! 300 जणांसाठी आज प्रशिक्षण

मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी पालिका अभियंत्यांना ‘आयआयटी’ मुंबईकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या 300 अभियंत्यांना  सिमेंट-काँक्रीट रस्ते बनवताना कोणती काळजी घ्यावी, आणि कोणते तंत्रज्ञान वापरावे यासाठी तज्ञ प्राध्यापकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

रस्त्याची कामे दर्जेदार होण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. यामध्ये आता रस्ते बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, रस्ते बांधणी करताना काय करावे, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया अनुभवी अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आयआयटी मुंबई पवई येथे 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही  कार्यशाळा होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा शुभारंभ होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील नामांकित तज्ञ प्रा. डॉ. के. व्ही. कृष्ण राव हे महानगरपालिका अभियंत्यांना प्रमुख मार्गदर्शन करतील.