जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी अधिक; आयआयटी प्रवेशाचा मार्ग खडतर

जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी यंदा पात्र विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच 100 पर्सेंटाईल मिळविणारे विद्यार्थीही वाढले आहेत. त्यामुळे देशातील 32 आयआयटीमध्ये प्रवेशाचा मार्ग खडतर होणार आहे. मागील वर्षी खुल्या प्रवर्गाचा पात्रता कटऑफ 90.77 पर्सेंटाईल होता. यंदा तो 93.2वर पोहोचला आहे. याचाच अर्थ ज्या विद्यार्थ्यांना 93.2 ते 100 पर्सेंटाईल आहेत असेच विद्यार्थी आयआयटी परीक्षेत सहभागी होऊ शकतील अशा विद्यार्थ्यांची संख्या 97 हजार 351 एवढी आहे.

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता आयआयटी प्रवेशासाठी होणाऱया जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी सध्या सुरू आहे. या परीक्षेसाठी सुमारे 2 लाख 50 हजार 284 विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये ही संख्या 2 लाख 51 हजार 673 होती. यंदा खुल्या प्रवर्गासह राखीव प्रवर्गाच्या कटऑफमध्येही वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांचा ट्रेंड पाहता यंदा जेईई अॅडव्हान्स परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता पर्सेंटाईल यंदा अधिक आहे. यंदा 56 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल आहे.

आयआयटी, एनआयआयटीमधील प्रवेश क्षमता
n 23 आयआयटी एकूण जागा 17 हजार 385
n 32 एनआयटी एकूण जागा 23 हजार 954

राखीव प्रवर्गाची कटऑफ

जनरल ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी यंदा 81.32 पर्सेंटाईल तर गेल्या वर्षी 75.6 कटऑफ होती. वर्ष 2022मध्ये याच प्रवर्गात कटऑफ 63.1 होती. तर ओबीसी प्रवर्गासाठी यंदा कटऑफ 79.67 असून गेल्या वर्षी 73.6 आणि वर्ष 2022मध्ये 68 एवढी कटऑफ होती.

26 मे रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा

जेईई अॅडव्हान्स परीक्षा 26 मे रोजी होणार असून या परीक्षेसाठी 27 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थी 7 मेपर्यंत परीक्षा अर्ज करू शकतात. या परीक्षेचा निकाल 9 जून रोजी जाहीर होणार आहे.