कंपनीच्या नावे बँक खाते खोलून त्याची सायबर गुन्हेगारांना विक्री

नियमानुसार कंपनी स्थापन करून त्या कंपनीच्या नावे बँकेत करंट खाते खोलायचे. त्यानंतर ते खाते सायबर गुन्हेगारांना विकणाऱया चमन गुप्ता (40) याच्या डी. बी. मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याने  चार बँक खाती तीन लाखांत सायबर गुन्हेगारांना विकल्याचे समोर आले आहे.

अहमदाबादेत एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून त्यातील बरेच जण एसएस इक्विटेबल या अॅपमध्ये सहभागी आहेत. डी. बी. मार्ग परिसरात राहणाऱया वैशाली यांचा भाऊदेखील त्या ग्रुपमध्ये होता. भावाच्या सांगण्यावरून वैशाली यांनीदेखील तो अॅप डाऊनलोड केला होता. त्या अॅपमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला फायदा मिळतो असेही त्याने सांगितले होते. त्यानंतर त्या अॅपच्या अॅडमिनने वैशाली यांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे  वैशाली यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे तसेच सूरज धायगुडे व विशाल भगत या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा सुरतमध्ये राहणारा चमन गुप्ता याचे नाव समोर आले. त्यानुसार पथकाने सुरत गाठून चमनला पकडले.