राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी झेंडा, ‘एकदा काय झालं’ आणि ‘गोदावरी’ने पटकावला पुरस्कार

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा फडकला. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. तर ‘गोदावरी’ या चित्रपटासाठी निखिल महाजन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

2021 या वर्षातील राष्ट्रीय पुरस्कार आज घोषित झाले. पुरस्कारांमध्ये मराठीची मोहोर उमटली. प्रतिमा जोशी दिग्दर्शित आणि चंद्रकांत कुलकर्णी निर्मित ‘चंद साँसे’ हा कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित ‘रेखा’ या लघुपटाने नॉन फिचर फिल्म श्रेणीत स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड पटकावला आहे.

‘रॉकेट्री’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘रॉकेट्री – द नांबी इफेक्ट’ने सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मवर नाक कोरले. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान ‘सरदार उधम सिंह’ने पटकावला. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’चा दबदबा दिसून आला. आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना अनुक्रमे ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘मिमी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला. अभिनेत्री पल्लवी जोशीला ‘द काश्मीर फाइल्स’साठी तर पंकज त्रिपाठीला ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

– फिचर फिल्म श्रेणी – सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर ः किंग सॉलोमन (आरआरआर)

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ः गांधी आणि पंपनी, सर्वोत्कृष्ट बालकलाकारः भावेन रबारी (छेलो शो), सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ः एम. एम. किरावानी (आरआरआर) आणि देवी श्री प्रसाद (पुष्पा), सर्वोत्कृष्ट गीत ः चंद्र बोस (काsंडा पोलम), सर्वोत्कृष्ट संकलन ः संजय लीला भन्साळी (गंगुबाई काठियावाडी), राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ः द कश्मीर फाइल्स. n नॉन फिचर फिल्म श्रेणी – सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ः मिठू दी (इंग्रजी), थ्री टू वन (मराठी आणि हिंदी).

‘गोदावरी’ हा चित्रपट निशिकांत कामत सरांसाठी केला. ते माझं आवडते दिग्दर्शक होते. त्यांच्या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यामुळे मी खूपच भावनिक झालोय. एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. खरं तर हा जितूचा पुरस्कार आहे. माझे आईबाबा आणि विक्रम गोखले यांना हा पुरस्कार समर्पित करतो. विक्रम गोखले तर शूटिंगच्या पहिल्या दिवशी म्हणाले होते की, तुला पुरस्कार मिळणार. हे यश पाहायला आज ते आपल्यात नाहीत.
– निखिल महाजन, दिग्दर्शक ‘गोदावरी’

मध्यमवर्गीय मुलांच्या स्वप्नांना बळ देणारा हा पुरस्कार आहे असं मी मानतो. कारण मला कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नाही. तुम्ही मनापासून काम केलं तर राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवू शकता, हे दाखवून देणारा हा पुरस्कार आहे. माझी मुलं शुभंकर आणि अनन्या मला रोज गोष्ट सांगा म्हणतात. माझ्या मनातील निरोप मी मुलांना गोष्टीच्या रूपाने सांगतो. त्यामुळे माझ्या मुलांचा हा पुरस्कार आहे.
– सलील कुलकर्णी, दिग्दर्शक ‘एकदा काय झालं’

प्रिया तेंडुलकरांची ही गोष्ट खूप दिवसांपासून प्रतिमाच्या डोक्यात होती. कोरोनाच्या कठीण काळात व्यवस्थित नियोजन करून आम्ही या शॉर्ट फिल्मचे शूटिंग केले. आमच्या कलाकृतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली याचा आम्हाला खूप आनंद होतोय.
– चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते (चंद सॉंसे)