‘मिशन आरंभ’परीक्षेतून 1065 विद्यार्थी चमकले, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उपक्रम

नगर  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी 2025ची तयारी म्हणून घेतलेल्या ‘मिशन आरंभ शिष्यवृत्ती’ परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. 23) दुपारी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. यामध्ये चौथीचा 44, तर सातवीचा 33 टक्के निकाल लागला. या दोन्ही वर्गांतील 1 हजार 65 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यातील निवड झालेल्या इयत्ता 4थी व 7वीमध्ये प्रथम येणाऱया 500 विद्यार्थ्यांना वर्षभर तज्ञ शिक्षकांद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन दिले जाणार आहे.

नगर जि.प.चे सीईओ आशीष येरेकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2024-25मध्ये होणाऱया इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत जिह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी ‘मिशन आरंभ 2024’ हा उपक्रम सुरू केला आहे. यातून 5वी व 8वीच्या परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, म्हणून यावर्षी जुलैपासूनच 4थी व 7वीच्या वर्गाच्या शिष्यवृत्ती जादा तासाचे नियोजन केले होते. सराव चाचण्याही घेतल्या. त्यानंतर 10 मार्च रोजी 4थी व 7वीच्या विद्यार्थ्यांच्या केंद्रनिहाय परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल शनिवारी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.

या परीक्षेसाठी चौथी ः 42587, सातवी ः 9823. गुणवत्ता यादी इयत्ता चौथीः 518, इयत्ता सातवीः 547. उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता चौथीः 18,665, इयत्ता सातवी ः 3161. उर्दू माध्यम उत्तीर्ण चौथी 203, सातवीः 89 विद्यार्थी बसले होते

चौथीसाठी राहाता तालुक्यातील नांदुर्खी खुर्द शाळेची आरोही वाणी हिने 290 गुण मिळवत जिह्यात प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती शेलार (जि. प. शाळा रुईगव्हाण, ता. कर्जत), शिवतेज गांगर्डे (जि. प. शाळा, वाकनवाडी), आदिराज वाकडे (जि. प. शाळा, दत्तवाडी, ता. श्रीगोंदा, 288 गुण, सर्व द्वितीय), वेदांत दळवी (286 गुण, जि. प. शाळा, श्रीगोंदा, तृतीय) आला.

सातवीचा श्रीगोंदा तालुक्यातील जि. प. शाळा रुईखेल येथील रमाकांत महाडिक याने 258 गुण मिळवत जिह्यात प्रथम क्रमांक मिळविला. प्रांजल भालेकर (द्वितीय, 256 गुण) व आदिती वाव्हळ (तृतीय, 254, दोघेही जि. प. शाळा, पिंपरी जलसेन).