14th Hockey India Senior Women’s National Championship – महाराष्ट्राचे राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले, हरयाणाचा विजय

महाराष्ट्राचे राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या वर्षी भंगले. 14व्या हॉकी इंडीया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी (23 मार्च 2024) हरयाणाने पेनल्टी शूटआउटमध्ये महाराष्ट्राचा 0-3 असा पराभव केला.

नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी राहिल्याने पेनल्टी शूटआउटद्वारे जेतेपदाची कोंडी फोडण्यात आली. महाराष्ट्राकडून प्रियंका वानखेडे, आकांक्षा सिंग आणि ऋतुजा पिसाळ यांना गोल करण्यात अपयश आले. दुसरीकडे, हरयाणाच्या नवनीत कौर,उषा आणि सोनिका यांनी चेंडूला अचूक गोलपोस्टमध्ये टाकताना 3-0 अशा फरकाने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

फायनलमध्ये निर्धारित वेळेतील दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून झाले. पहिल्या क्वार्टरमध्ये गोलफलक कोरा राहिला. मात्र, दुसर्‍या गोलमध्ये महाराष्ट्राचा बचाव भेदण्यात दीपिकाला यश आले. तिने 26व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे चेंडूला अचूक गोलजाळ्यात टाकताना हरयाणाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

तिसर्‍या क्वार्टरपर्यंत हरयाणाला आघाडी राखण्यात यश आले. मात्र, चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये महाराष्ट्राला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर अक्षता ढेकळेने यजमांनाना बरोबरी गाठून दिली. जवळपास दोन मिनिटांपूर्वी हरयाणाला पेनल्टी कॉर्नरद्वारे आणखी एका गोलचि संधी होती. मात्र, त्यांना संधीचे गोलामध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. त्यामुळे निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी राहिली.

मागील वर्षीही महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, मध्य प्रदेशकडून मात खावी लागली. यंदा घरच्या पाठिराख्यांसमोर अपेक्षा वाढल्या. मात्र, अंतिम फेरीत हरयाणाविरुद्ध लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. दुसरीकडे, पाच वेळचा उपविजेता हरयाणाची फायनलमध्ये प्रवेशाची करण्याची सहावी वेळ होती. महाराष्ट्राला हरवून त्यांनी चार वर्षांनंतर (2020) पुन्हा ट्रॉफी उंचावली.

तत्पूर्वी, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकासाठीच्या लढतीत हॉकी झारखंडने गतविजेता मध्य प्रदेशला 2-0 असे पराभूत केले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संगीता कुमारीने तिसर्‍या मिनिटाला मैदानी गोलद्वारे झारखंडचे खाते उघडले. त्यानंतर सामना संपायला एक मिनिट शिल्लक असताना सुप्रिया मुंडूने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना आघाडी वाढवली.