छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

बारावीच्या परीक्षेत राज्यात 306 कॉपी प्रकरणे

बोर्डाच्या परीक्षांमध्ये कॉपीचा नवा पॅटर्न गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून यंदा सर्वाधिक कॉपी प्रकरणे छत्रपती संभाजीनगरात पकडण्यात आली आहेत. गेल्या वर्षीदेखील कॉपी प्रकरणात छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडीवर होता.

राज्यात यंदा बारावीच्या परीक्षेत एकूण 306 कॉपी प्रकरणे समोर आली असून यापैकी सर्वाधिक 142 प्रकरणे छत्रपती संभाजीनगरात आढळून आली आहेत. त्याखालोखाल कॉपी करण्यात पुणे विभागाचा क्रमांक आहे. यंदा पुण्यात 68 कॉपी प्रकार समोर आले आहेत. कोल्हापूर विभागात एकही कॉपी प्रकार समोर आला नसून कोकण विभागातही 7 कॉपीबहाद्दर आढळून आले आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कॉपी प्रकरणांत घट झाली असली तरी अनेक विभागांत कॉपीचे प्रकार वाढले आहेत. गेल्या राज्यात एकूण 345 कॉपी प्रकरणे समोर आली होती. मुंबई विभागात यंदा 11 कॉपी प्रकरणे आढळून आली आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मुंबईत कमी कॉपी प्रकार समोर आले आहेत.

विभागनिहाय कॉपी प्रकरणे

पुणे                            68

नागपूर                       18

छत्रपती संभाजीनगर     142

मुंबई                          11

कोल्हापूर                    00

अमरावती                   11

नाशिक                       23

लातूर                         26

कोकण                       07