निकृष्ट पोषण आहारप्रकरणी बचत गटावर गुन्हा; सांगलीमध्ये मुलांना विषबाधा प्रकरण

महापालिकेच्या वान्लेसवाडी येथील शाळेत मुलांना निकृष्ट पोषण आहार दिल्याप्रकरणी महिला बचत गटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी घडली होती. पोषण आहारामुळे 36 मुलांना विषबाधा झाली. याप्रकरणी शिक्षण मंडळाचे लेखापाल गजानन बुचडे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. बचत गटातील सात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बचत गटाच्या अध्यक्ष वंदना धनंजय रूपनर, सचिव सरस्वती भगवान रूपनर, शालन आकाराम रूपनर, पार्वती लक्ष्मण कोळपे, मुक्ता महादेव रूपनर, सुरेखा संजय कोळपे, पूजा सचिन रूपनर अशी गुन्हा दाखल झालेल्या सदस्यांची नावे आहेत.

वान्लेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेत पोषण आहार व मध्यान्ह भोजन पुरविण्याचा ठेका हौसाबाई रूपनर महिला बचतगटाला देण्यात आला होता. 27 जानेवारी रोजी बचतगटाकडून मुलांना भोजन देण्यात आले. भोजनानंतर पाचवी ते सातवीच्या 279 विद्यार्थ्यांपैकी 36 मुलांना मळमळ, पोटदुखी, उलटी होऊ लागली. मुख्याध्यापकांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांना बोलावून तपासणी केली होती.

बचत गटाकडून देण्यात आलेले अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. दरम्यान, उपायुक्त स्मृती पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी एस. व्ही. हिरेमठ यांनी बचत गटाच्या स्वयंपाकगृहाची तपासणी करून अहवाल आयुक्त सुनील पवार यांना सादर केला होता. या चौकशी अहवालात मुलांना खराब अन्न पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आयुक्तांनी महिला बचत गटाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण मंडळाला दिले होते. लेखापाल बुचडे यांनी फिर्याद दाखल केली.