पुण्यातून दररोज 7 वाहनांची चोरी

>> गणेश राख

शहरात वाढत्या गुन्हेगारीबरोबरच सराईत वाहनचोर सुसाट सुटले असून, गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच 180 दिवसांत शहर परिसरातून तब्बल 1 हजार 32 वाहने चोरीला गेल्याचे समोर आले आहे. वाहनचोरीचा हा आलेख वाढतच असून, नागरिकांना महागड्या वाहनांना मुकावे लागत आहे. शहर परिसरातील सार्वजनिक रस्ते असो वा खासगी पार्किंग सर्वच ठिकाणी वाहनचोर सक्रिय आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगार तसेच गुन्हेगारी टोळ्यांनी डोके वर काढले आहे. यातूनच वाहन तोडफोड, फायरिंगसारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस लक्ष देत असून, गुन्हेगारांची धरपकडदेखील सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शहरात सराईत वाहनचोरांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. घराजवळ, सोसायटीच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरी होणाऱ्या वाहनांमध्ये महागड्या कार, रिक्षा, दुचाकींचा समावेश असून, सर्वाधिक प्रमाण हे दुचाकींचे आहे. मात्र, वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वाहनचोरांच्या टोळ्या, त्यांची गुन्हेपद्धती तसेच चोरीच्या वाहनांची लावण्यात येणारी विल्हेवाट याबाबत पुरेशी माहिती नसल्याने चोरीला गेलेली वाहने सापडणे कठीण ठरते.

शहरात लावलेल्या सीसीटीव्हींमुळे पोलिसांना आरोपी पकडण्यासाठी काही प्रमाणात मदत होते. मात्र, चोरलेली वाहने नंबर प्लेट, चासिस नंबर बदलून पुन्हा वापरात आणली जातात किंवा परराज्यांत त्यांची विक्री केली जाते. अनेकदा त्याचे सुटे भाग करून वापरले जातात, त्यामुळे गाडीची ओळख पटविणे कठीण होते. यामुळे अनेकदा चोरीची वाहने मिळून येत नाहीत. दुचाकीसारखे एखादे वाहन चोरी गेल्यानंतर ते परत मिळेल, अशी आशाच नागरिकांकडून सोडून दिली जाते.

… झोन 4 व 5 मध्ये सर्वाधिक वाहनचोऱ्या
शहरातील एकूण वाहनचोरीच्या घटनांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच 633 वाहनचोरीच्या घटना या झोन 4 आणि 5 मध्ये घडल्या आहेत. यामध्ये हडपसर, मुंढवा, कोंढवा, चंदननगर, लोणीकंद, विमानतळ, चतुःशृंगी यांसह इतर पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. यामुळे या भागात सराईत वाहनचोरांचा वावर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. वाहनचोरांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र पथके आहेत. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नाही. दिवसाढवळ्या होणाऱ्या वाहनचोऱ्यांमुळे पायी पेट्रोलिंग, पोलिसांची गस्त यावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.