
लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे सामान्य प्रवाशांचे हकनाक बळी जाण्याचे सत्र सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज सरासरी तीन प्रवाशांचा अपघाती मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. पेंद्र सरकारने बुलेट ट्रेनवर हजारो कोटींचा खर्च करण्याआधी मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे, लोकल प्रवाशांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मांडली.
लोकल ट्रेन प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रवासी सुरक्षेच्या मुद्दय़ाची गंभीर दखल घेतली. आपण लोकल प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी ठोस भूमिका घेणार असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी प्रवासी सुरक्षेसंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यादृष्टीने रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली. याच अनुषंगाने उपनगरी रेल्वेमार्गावर धावणाऱया एकूण लोकल फेऱया, प्रवासी संख्या, गाडय़ांचा वक्तशीरपणा, ‘पीक अवर्स’ला होणारी गर्दी व त्यात प्रवाशांचे होणारे मृत्यू आदी बाबींचा सविस्तर तपशील मागवला आहे. त्याआधारे आपण पेंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाकडे भूमिका मांडणार आहोत, मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षितच असला पाहिजे. पेंद्र सरकारने बुलेट ट्रेनवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा दररोज मृत्यूची नोंद होत असलेल्या लोकल प्रवासाच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.
लवकरच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार
रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने लोकल प्रवासी सुरक्षेची सद्यस्थिती आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आपण लवकरच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन प्रवासी सुरक्षेबाबत चर्चा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


























































