
देशातील महामार्गांवर प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी आणि टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकार नवीन FASTag आणणार आहे. एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या वाहनांना कायदेशीररीत्या टोल टॅक्समधून सवलत मिळालेली आहे. त्यांच्यासाठी सरकार लवकरच विशेष प्रकारचे FASTags सुरू करण्याची योजना आखत आहे. सध्या अनेक महत्त्वाची पदे भूषवणारे व्हीआयपी अधिकारी, लष्करी वाहने, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना टोल भरावा लागत नाही. मात्र टोल नाक्यावर पोहोचल्यावर ही वाहने ओळखण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अनेकदा बराच वेळ जातो. ज्यामुळे मागून येणाऱ्या इतर वाहनांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि वेगवान करण्यासाठी सरकार आता मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टम अंतर्गत या विशेष फास्टॅगचा विचार करत आहे.
या नव्या प्रणालीअंतर्गत टोलमुक्त असलेल्या वाहनांसाठी वेगळ्या रंगाचे किंवा विशेष कोडिंग असलेले फास्टॅग दिले जातील. जेव्हा ही अधिकृत वाहने टोल नाक्यावरून जातील, तेव्हा तिथले आधुनिक स्कॅनर आपोआप ओळखतील की हे वाहन टोल-फ्री श्रेणीतील आहे. यामुळे वाहन न थांबवता थेट पुढे जाऊ शकेल. यासोबतच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय डेटाबेसमध्ये अशा सर्व अधिकृत वाहनांची नोंद केली जाईल, जेणेकरून फास्टॅगचा कोणताही गैरवापर किंवा फसवणुकीचे प्रकार थांबवता येतील. लष्करी वाहनांच्या बाबतीत सुरक्षेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांच्या हालचालींची माहिती नोंदवल्यानंतर ती तत्काळ यंत्रणेतून डिलीट करण्याची सोयही या तंत्रज्ञानात असणार आहे.
वृत्तानुसार, सरकार सध्या या योजनेसाठी दोन वेगवेगळ्या मॉडेल्सवर विचार करत आहे. यातील पहिल्या पद्धतीनुसार अधिकृत संस्थांना अनलिमिटेड फ्री-पास असलेले डेडिकेटेड फास्टॅग दिले जाऊ शकतात. तर दुसऱ्या पद्धतीनुसार टोल फ्री वाहनांची माहिती थेट मंत्रालयाच्या मुख्य डेटाबेसशी जोडली जाईल, जेणेकरून स्कॅनिंग सिस्टम त्यांना थेट ओळखू शकेल. देशात लवकरच बॅरियर-विरहित म्हणजेच टोल नाक्यांवर खांब नसलेली हायवे सिस्टीम लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जिथे कॅमेरे आणि सॅटेलाईटच्या मदतीने वाहनांचा टोल कापला जाईल.





























































