अहिल्यानगर जिल्हा बँकेवर त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ahilyanagar-district-bank-board-dismissed-administrator-appointed-election-signals

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पाहण्यासाठी आता बँकेवर प्रशासकाऐवजी तीन सदस्यीय प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी बँकेवर प्रशासक (प्राधिकृत अधिकारी) नियुक्त करण्यात आला होता. परंतु, आता विभागीय सहनिबंधक संभाजी निकम (नाशिक) यांनी त्यामध्ये बदल करत बँकेवर प्राधिकृत अधिकारी मंडळ (प्रशासकीय मंडळ) नियुक्त केले आहे.

तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळाने पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. विभागीय सहनिबंधकांनी यासंदर्भातील आदेशात कोणतेही स्पष्टीकरण न देता हा बदल केला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या फेब्रुवारी 2026 मध्ये संपुष्टात आली. संचालक मंडळाची निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुरुवातीला राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रतीक्षा होती.

आता विधान परिषद अहिल्यानगर मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणुकीची आचारसंहिता 22 जूनपर्यंत आहे. संचालक मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने विभागीय सहनिबंधक निकम यांनी बँकेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून महिन्यापूर्वी नियुक्ती केली होती.

त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी या आदेशामध्ये बदल करत बँकेच्या कारभारावर तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळामार्फत नियंत्रण ठेवले जाईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. प्रशासकीय मंडळात विभागीय सहनिबंधक निकम अध्यक्ष असतील, तर सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक निकाळजे हे दोघे सदस्य असतील. या तिघांनीही पदभार स्वीकारला आहे.