
>> डॉ. विद्यासागर पाटंगणकर
वारीमध्ये स्थान एक आहे, दैवत एकच आहे आणि तीर्थही एकमेव आहे. वर्षानुवर्षे त्यात परिवर्तन होत नाही. पुण्यप्राप्ती वा पापक्षालन ही व्यक्तिगत भूमिका नसल्याने कर्मकांड आणि इतर सोपस्कार नाहीत. वारीमागील भूमिका ही आपल्या उपास्य देवतेकडे अंतःकरणपूर्वक जाण्याची आहे. काया-वाचा-मन अशा तीनही पातळांवरून केलेली ही तपश्चर्या आहे. प्रसिद्ध आधुनिक संत वै. धुंडामहाराज देगलूरकर म्हणतात की, अभिमान, उपदान, ईज्या, स्वाध्याय आणि योग हे भक्तीचे पाच प्रकार आगम ग्रंथात सांगितले आहेत. त्यातले अभिगमन म्हणजे उपास्य देवतेकडे जाणं हीच वारी होय!
वारी आणि वारी करणारा वारकरी हा महाराष्ट्रीय नव्हे, तर एकूणच भारतीय सांस्कृतिक परंपरेचा प्राणभूत घटक आहे. त्याचे ऊर्जा केंद्र श्री विठ्ठल आहे. पंढरपूरचा श्री विठ्ठल आणि वारकरी यांचे घनिष्ठ संजीवक नाते आहे. वारी म्हणजे पंढरीची वारी हे आपण गृहीतच धरलेले असते. वारी करणारा तो वारकरी, त्याचेच पुवारकरी असे रूप प्रचलित झाले. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निळोबा अशा नामवंत संतांनी वारकरी होण्यात धन्यता मानली. ‘जाय जाय तू पंढरी होय वारकरी।’ असे संतांचे उद्गार याची साक्ष देतात.
वारकऱ्यांना गीता आणि भागवत हे ग्रंथ प्रमाणभूत आहेत. श्रीमद भागवतातील 11 व्या स्कंधात कृष्णाने उद्धवाला ज्ञान सांगितले. याप्रसंगी सगुण भक्ती कशी करावी, हे सांगताना भागवत धर्माचे निरूपण आणि वैदिक, तांत्रिक पूजोपचारांविषयीचे वर्णन केले आहे. त्यात पर्व, यात्रा, महोत्सव यांचा उल्लेख आला आहे. प्रत्यक्ष पंढरीच्या आषाढी कार्तिकी या वाऱया कधीपासून सुरू झाल्या असाव्यात, याचा शोध घेता काही शिलालेखांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. इ.स.च्या सहाव्या शतकापासून उत्तरोत्तर पंढरपूर क्षेत्राचे आणि विठ्ठल या दैवताचे महत्त्व वाढत गेल्याचे दिसून येते. राजे, धनिक, अधिकारी यांनी विठ्ठलाप्रीत्यर्थ दान-धर्म-यज्ञयाग केल्याचे आसामान्यांपासून ते राजे-रजवाडय़ापर्यंत विठ्ठल भक्तीचा मळा सातत्याने फुलत गेल्याचे ऐतिहासिक कागदतपत्रे आणि शिलालेख यांतील उल्लेखावरून दिसते.
संत ज्ञानेश्वरांच्या काळात संत नामदेव आणि त्यांचा संतमेळा वारीच्या अद्भुत सोहळ्यात न्हाऊन निघाला. पुएकनाथांचे पणजोबा श्री भानुदास यांनी वारीचा नियम एकनिष्ठेने चालवला. संत एकनाथ, त्यांचे पंचक, संत तुकाराम, त्यांचा शिष्य परिवार यांनी वारीची निष्ठा प्रकट केली आहे. दिंडी-वारी या लोक सांस्कृतिक परंपेरचा इतर धर्मीय वा सांप्रदायिक परंपरांशी तुलनात्मक दृष्टीने अभ्यास होण्याची गरज आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, कीर्तनाचेनि नटनाचे। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे। मग नामहि नाही। पापाचे ऐसे केले।
वारीमध्ये स्थान एक आहे, दैवत एकच आहे आणि तीर्थही एकमेव आहे. वर्षानुवर्षे त्यात परिवर्तन होत नाही. पुण्यप्राप्ती वा पापक्षालन ही व्यक्तिगत भूमिका नसल्याने कर्मकांड आणि इतर सोपस्कार नाहीत. वारीमागील भूमिका ही आपल्या उपास्य देवतेकडे अंतःकरणपूर्वक जाण्याची आहे. काया-वाचा-मन अशा तीनही पातळींवरून केलेली ही तपश्चर्या आहे. वारीत भक्तिप्रधानता असते, तर यात्रेत कर्मकांडाचे प्राबल्य दिसते. वारीत देवाच्या दर्शनाबरोबरच संतदर्शनही महत्त्वाचे असते. म्हणून प्रत्येक शुद्ध एकादशीस देवीची आणि वद्य एकादशीस संतांची वारी असते. पंढरी ही देवाची वारी, तर आळंदी ही संतांची वारी आहे. वंश परंपरेने, कुल परंपरेने वारीची स्वीकृती आणि प्रचलन होते. म्हणून वारी आणि इतर यात्रा याचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करणे हे जागतिकीकरणाच्या संदर्भात वैश्विक दृष्टीने आवश्यक वाटते.
दिंडी ही एक लोक सांस्कृतिक परंपरा आहे. दिंडी आणि वारी यांचा वारकरी संप्रदायाशी आणि तत्त्वज्ञानाशी अन्योन्य संबंध आहे. दिंडी ही एक सामूहिक भक्तीची परंपरागत अभिव्यक्ती आहे. ती आचारप्रधान आहे. प्रसिद्ध आधुनिक संत ह. भ. प. किसनमहाराज साखरे यासंबंधी म्हणतात की, दिंडीमुळे तीन प्रकारची तपे घडतात. कायिक, वाचिक आणि मानसिक तप. पायी चालण्याने कायिक तप, नामस्मरण-भजन, गायनामुळे वाचिक तप आणि पंढरीचा ध्यास हे मानसिक तप होय, म्हणून त्रिविध तापांचे निर्मूलन करणारे दिंडी हे श्रेष्ठ साधन आहे.
दिंडीची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते. दिंडीसोबत पालखी असते. त्यात पादुका असतात. संत आपल्यासोबत वारी करत आहेत, आपण संतांसोबत आहोत, अशी ही जाणीव दुहेरी आनंद देणारी ठरते. दिंडी म्हणजे दिंडय़ा-पताकांचे एक मनोहारी विश्वरूप दर्शनच होय.
एकंदरीतच वारकरी चळवळ ही केवळ घोषणाबाजीपुरती नव्हती; वारकरी पंथीय तत्त्वज्ञानाने हे जे परिवर्तन घडवून आणले, यामागे एक भक्कम विचार होता. मानवतावादी विचारसरणीच्या व्यापक अधिष्ठानावर ही चळवळ उभी राहिली. वारकरी पंथाने एक नवदृष्टी दिली, नवा जीवन संदर्भ दिला. व्यक्तीचे सामाजिक मूल्य आणि व्यक्तीचे व्यक्तिगत मूल्य असे दुहेरी मूल्य त्याला लाभले. वाडी-वस्तीवरचे, वेशीबाहेरचे, गाववाडय़ाच्या आतले आणि बाहेरचे लोक एक झाले. भेद संपुष्टात आले. चंद्रभागेच्या तीरावर हे भेद गळून पडले. पंढरपूर हे क्षेत्र, पांडुरंग हे दैवत आणि नाम हे साधन झाले. तेच साध्य झाले.
(लेखक संत साहित्य अभ्यासक आहेत)





























































