
>> डॉ. समिरा गुजर जोशी
[email protected]
मेघदूत वाचताना त्यातील भावविभोर करणारे भौगोलिक वर्णन, त्यातील कल्पनारम्यता स्तिमित करते. विरहाने व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या आर्त मनाला कालिदासासारख्या सिद्धहस्त लेखकाचा स्पर्श होऊन निर्माण झालेल्या या सुंदर काव्याचे रसग्रहण करणे हा वेगळाच अनुभव ठरतो.
कविकुलगुरू कालिदासाचे कौशल्य त्याच्या एकेका श्लोकातून जाणवत राहते. तो व्यक्ती म्हणून स्वत कसा असेल याचं कुतूहल नकळत मनात जागं होतं. ‘मेघदूता’तील कोणताही श्लोक वाचताना असं वाटतं, हे कालिदास लिहितो आहे तर हा अनुभव त्याने कधी घेतला असेल? इतकं सुरेख भौगोलिक वर्णन तो करतो.
कामाच्या निमित्ताने तो विविध राज्ये फिरला असला पाहिजे. शक्य आहे, पण तो केवळ राजप्रासादात रमणारा वाटत नाही. आजच्या काळातील एखादा तरुण बॅकपॅक पाठीवर टाकून भटकंतीला बाहेर पडावा तसा तो डोंगरदऱयांमधून स्वैर भटकला असला पाहिजे. म्हणून तर निसर्गातील इतकी सुंदर दृश्यं तो टिपतो. वाऱयावर स्वार झालेला मेघ पाहताना त्या पथिकवनितांचे तो वर्णन करतो. ज्यांचा पती प्रवासाला गेला आहे त्या पथिकवनिता. पती दूरदेशी गेल्यावर पत्नीचं मन नटण्यासजण्यात कसं रमणार? त्यांचं कशातच लक्ष नाही. कशीबशी घरातली, अंगणातली कामं पूर्ण करत आहेत. काम करताना कसेतरी बुचडा बांधलेले केस. त्याच्या बटा सुटून कपाळावर रुळत आहेत आणि त्यांना वाऱयावर स्वार होऊन आलेला काळा मेघ दिसतो. हातातले काम सोडून मान उंचावून त्या मेघाकडे बघताना त्या कपाळावर रुळणाऱया त्या बटा सहज कानामागे खोचतात. त्यांच्या डोळ्यांत आनंद आणि विश्वासाची चमक दिसते की, मेघ आला म्हणजे आता प्रियकर येईल.
यक्ष मेघाला म्हणतो, “असा विरही जनांना आश्वस्त करण्याचा तुझा स्वभावच आहे. तू आल्यावर कोणता प्रियकर आपल्या प्रियेपासून दूर राहतो! माझ्यासारखा दुर्दैवी एखादाच रे!’’ कालिदासाचा यक्ष असं गोड बोलून आपली केस मेघापुमांडू लागला की, मात्र कालिदास राजाचा वकील असावा याची खात्री पटू लागते. आता तो मेघाला आमिष दाखवतो आहे की, “मंद मंद वाऱयावर स्वार होऊन तू दूर असलेल्या अलकानगरीची वाट चालू लागशील तर प्रवास लांबचा असला तरी तुला सोबत आहे. त्यामुळे तुझा प्रवास छान होणार आहे.’’
आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गातल्या घटनांभोवती किती रम्य कल्पना गुंफल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात बगळ्यांची माळ आकाशात हमखास दिसते. बालकवी ‘श्रावणमासी’ कवितेत लिहितात – ‘बलाकमाला उडता वाटे कल्पसुमांची मालचि ते। उतरून येती अवनीवरती ग्रहगोलच की एकमते।’ किंवा वा. रा. कांत लिहितात – ‘बगळ्यांची माळफुले अजुनी अंबरात’. कालिदास त्याच बगळ्यांच्या माळेचे वर्णन करतो आहे, पण त्याच्या दिमतीला एक गोड कविकल्पना आहे. मेघगर्जना ऐकून बगळ्यांना गर्भधारणा होते अशी ही कल्पना. म्हणजे मीलनाच्या क्षणाला सार्थक ठरवणारा स्वर मेघाचा असल्यामुळे त्याच्याविषयी एक आगळी कृतज्ञता, प्रेम बगळींच्या मनात आहे. अशा बलाकमालेची त्याला साथ लाभणार आहे. या श्लोकाचा शांताबाई शेळके यांनी केलेला अनुवाद असा – मंद मंद तुज वाहून नेईल वारा जेव्हा अपुल्या संगे। डावे घालील सखा जीवाचा चातक गाईल अतिअनुरागे। गर्भधारणा क्षण आठवूनी जुळतील गगनी बलाकमाला। नयन सुखद तुझं नभी पाहता सादर होतील तव सेवेला।।
राजहंसांचे खरे घर मानससरोवर, पण हिवाळा आला की, तिथले पाणी गोठून जाते आणि मग राजहंस व इतर पक्षी तिथून निघून जातात. पावसाळा सुरू झाला, चा गडगडाट ऐकला की, आपल्या निवासस्थानी परत जाण्याची उत्कंठा त्यांच्या मनात निर्माण होते. म्हणून यक्ष मेघाला सांगत आहे की, “तू जसजसा पुजाशील, तसतसे राजहंस पक्षीदेखील तुझ्याच दिशेने येतील. तुला ज्या अलकानगरीकडे जायचे आहे ती आणि मानससरोवर हे दोन्ही कैलासाच्या जवळच आहेत. त्यामुळे ते तुझी सोबत करत एकत्र प्रवास करतील.’’
हे राजहंस कसे आहेत, तर त्यांनी आपली शिदोरीही बरोबर घेतलेली आहे. कसली शिदोरी, तर कोवळी पालवी आणि बिस म्हणजे मृणाल – कमळाचा देठ. हीच त्यांची शिदोरी आहे. या राजहंसाला मेघाची चाहूल लागते ती कशी? त्याचे अतिशय सुंदर वर्णन करताना कालिदास म्हणतो, “जो मेघ पृथ्वीवर औषधी उगवण्यास (किंवा अळंबी उगवण्यास) आणि पृथ्वीला सुपीक बनवण्यास कारणीभूत ठरतो, त्या तुझ्या गडगडाटाची, तुझ्या गर्जनेची चाहूल लागताच राजहंस आनंदाने उड्डाण करतील. म्हणून एरवी चा गडगडाट कर्कश वाटू शकतो, पण पावसाळी ची चाहूल मात्र श्रवणसुभग, कानाला गोड वाटणारी असते.’’
भूगर्भीचे कन्द अंकुरित करून फेडती तिचे वांझपण। श्रवणमधुर ती तुझी गर्जिते ऐकून हृदयी हर्षित होऊन। कैलासावर मानससरसी जाण्यास्तव जे आतुर होतील। कमलदेठ घेऊनी शिदोरी राजहंस तुज संगे येतील।।
(ढा निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)





























































