अलिबागच्या कार्लेखिंड-सारळ पुलाला तडे; अवघे 25 टक्के काम झाले आणि तडे जाऊ लागले, एमएसआयडीसी अधिकाऱ्यांचा कानाडोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारळपूल मार्गाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या रस्त्याचे काम अवघे २५ टक्क्यांपेक्षाही कमी झाले असताना अनेक ठिकाणी तडे पडू लागल्या आहेत. त्यातच मजबुतीकरणाच्या नावाखाली कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून केमिकल मिक्स सिमेंट पावडर रस्त्यावर टाकल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र असे असताना एमएसआयडीसी अधिकारी कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत असून नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड ते सारळपूल, सारळपूल ते अलिबाग बायपास व कार्लेखिंड ते वायशेतदरम्यान नवीन सिमेंट काँक्रीट मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी १८८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. एमएसआयडीसीच्या देखरेखीखाली सद्यस्थितीत कार्लेखिंड ते सारळपूल व कार्लेखिंड ते वायशेतदरम्यान काम सुरू आहे. मात्र कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या मार्गावर २५ टक्क्यांपेक्षा कमी काम पूर्ण झाले असताना नव्याने बांधलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या आहेत. ज्याठिकाणी काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी साईटपट्टीचे काम केले गेले नाही. पावसाच्या पाण्यामुळे बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत काम सुरू ठेवणे योग्य आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अपघातांच्या प्रमाणात वाढ

सारळपूल ते कार्लेखिंडदरम्यान रस्त्याचे काम सुरू असून ठेकेदाराने मार्गावर मजबुतीकरणासाठी केमिकल मिक्स सिमेंट पावडर पसरवून ठेवली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे वाहन घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज सरासरी चार ते पाच दुचाकीस्वार घसरून पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः पावसाळ्यात ही पावडर अधिक धोकादायक ठरत असून वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी सांगितले.

कार्लेखिंड-सारळपूल मार्गाच्या कामाची वारंवार तपासणी करण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जर मार्गावर कुठे भेगा पडल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेण्यात येतील.

बी. के. सिंगनिवासी अभियंता, एमएसआयडी