
शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेने डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचे आरोपपत्र येत्या दहा दिवसांत दाखल केले जाईल, अशी हमी राज्य शासनाने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली.
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या म्हात्रेला कल्याण महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. हा जामीन उच्च न्यायालयाने स्थगित केला व हे प्रकरण स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतले. हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या मारहाणीचे आरोपपत्र दहा दिवसांत दाखल केले जाईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील शिषिर हिरे यांनी दिली. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती का केली जात नाही, असा सवाल न्यायालयाने केला. विशेष सरकारी वकिलाचीही नियुक्ती केली जाईल, असे अॅड. हिरे यांनी स्पष्ट केले. याआधी दुसऱ्या एका खटल्यात नियुक्ती केलेल्या विशेष सरकारी वकिलाला (विशेष सरकारी वकील प्रदीप घरत) तुम्ही तडकाफडकी काढून टाकलेत. म्हात्रेच्या खटल्यात नियुक्ती होणारा विशेष सरकारी वकील बदलू नका, असेही न्यायालयाने राज्य शासनाला बजावले. याप्रकरणात फॉरेंसिक लॅबचा अहवाल प्रलंबित आहे, असे अॅड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहणार
म्हात्रेच्या जामिनाला दिलेली स्थगिती आम्ही उठवत आहोत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याला महाराष्ट्राबाहेर राहावे लागेल. साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क करायचा नाही. त्यांना धमकवायचे नाही, यासह अन्य अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या आदेशाची प्रत आज, शुक्रवारी दिली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ही प्रत येईपर्यंत म्हात्रेला कारागृहातच राहावे लागणार आहे.
भविष्यात कोणीही धाडस करता कामा नये
डॉक्टरांना मारहाण करण्याचे धाडस कोणी भविष्यात करणार नाही, अशा प्रकारचे आदेश आम्ही देणार आहोत. आमच्या आदेशात त्याचा सविस्तर तपशील असेल, असेही न्यायालयाने नमूद केले.





























































