वसईत प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

१७ वर्षीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्राचार्याने लैंगिक छळ केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नराधम प्राचार्य स्टॅनी पिंटो हा पीडित मुलीला त्रास देत होता. पीडित विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनुसार आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा नोंद झाल्याची कुणकुण लागताच नराधम प्राचार्य फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित विद्यार्थिनी शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ती महाविद्यालयात अर्धवेळ कामही करत होती. प्राचार्य स्टॅनी पिंटो हा वारंवार तिला त्याच्या दालनात बोलावून तिच्या शारीरिक ठेवणीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करत होता. तसेच तिची परवानगी न घेता छायाचित्र काढून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचाही आरोप तिने तक्रारीत केला आहे. याशिवाय हॉटेलमध्ये रात्रभर सोबत राहण्यासाठी त्याने धमकावले होते, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.