
अमेरिकेत हायकिंग दरम्यान बेपत्ता झालेला हिंदुस्थानी वंशाचा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला आहे. विक्रम मुबायी असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सांता बार्बरा येथे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रम इन्यो नॅशनल फॉरेस्ट येथे हायकिंगला गेला होता. त्याने 1 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्याने हायकिंगच्या मार्गावर असताना आपले जीपीएस लोकेशन कुटुंबीयांना कळवले होते. मात्र ठरल्या वेळेत तो मुक्कामाच्या ठिकाणी परतला नाही किंवा कुटुंबाशी संपर्क केला नाही. यानंतर कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली.
विक्रमचा शोध घेण्यासाठी इन्यो काउंटी सर्च अँड रेस्क्यू आणि कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल यांनी शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेदरम्यान 3 ऑगस्टच्या संध्याकाळी इन्यो नॅशनल फॉरेस्ट येथे विक्रमचा मृतदेह आढळला. विक्रमच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. घातपाताचा कोणताही संशय किंवा पुरावाही आढळलेला नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.






























































