
भिकार शिक्षणव्यवस्था असताना विद्यार्थ्यांनी का नाही चिडायचं? असा परखड सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. तसेच जंतरमंतरवर झालेलं आंदोलन ही फक्त सुरुवात आहे, असे सूचक विधानही राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले, “नाशिकमध्ये 2015 चा जो कुंभमेळा झाला, त्यावेळी नाशिकमध्ये जी काही कामे झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा पार पडला, ते पाहता मला असं वाटतं की नाशिक शहरालादेखील कळलं नव्हतं की नेमकी कुठे काय कामे सुरू आहेत. ती कामे पूर्ण झाल्यानंतर मात्र सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झाले, काय विकास झाला आणि इतर सुविधा कशा उभ्या राहिल्या.
त्या कुंभमेळ्यात पैसे काढणं किंवा त्यामधून अर्थकारण करणं हा मुळात उद्देशच नव्हता. त्यामुळे तो अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने पार पडला. मी तुमच्याच माध्यमातून जे ऐकतो, त्यानुसार संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडले आहेत. काही गाड्या, ट्रक खड्ड्यांमध्ये गेले आहेत. माणसांचाही जीव गेला आहे. मात्र प्रशासनाला त्याचं काहीच वाटत नाही. माणसं मेल्याचं यांना कुठलंच सोयरसुतक नाही. सगळ्या कामांमधून कमिशन कसं मिळेल, हाच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या कुंभमेळ्यासाठी अनेक कंत्राटदार गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत, असाच प्रकार आहे. वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच हा कुंभमेळा करायचा आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व गोष्टी वरून आलेल्या आदेशांनुसारच हाताळायच्या असतील, तर त्यांनाच लखलाभ असो. त्यावेळी आम्ही इतकं सुंदर काम केलं होतं. आज त्याची झालेली दुर्दशा पाहून वाईट वाटतं. मग ते बोटॅनिकल गार्डन असो, माननीय बाळासाहेबांच्या नावाने उभारलेलं म्युझियम असो किंवा त्यावेळी केलेल्या इतर अनेक गोष्टी असोत. फक्त दुसऱ्याने केलं म्हणून त्या सगळ्याची वाट लावायची, एवढाच प्रकार सुरू आहे. त्या स्मार्ट सिटीजचं काय झालं? त्या स्मार्ट सिटीज कुठे गेल्या? देशातल्या कुठल्याही शहरात तुम्हाला त्या दिसत नाहीत. उलट सगळी शहरं बरबाद होताना दिसत आहेत.” नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जात आहेत. त्याविरोधात मोठं आंदोलन झालं, पण प्रशासन ढिम्म आहे. ही आंदोलनं सुरू असतानादेखील निवडणुका झाल्यानंतर जर पुन्हा भाजपलाच लोक निवडून देत असतील, तर मग भोगा. यावर मी अजून काय बोलू शकतो?”
यानंतर त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. “प्रत्येक आई-वडिलांचा मुलगा हा काही नीटच्या परीक्षेला बसलेला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी, जे तरुण तिथे आले होते, त्यांच्यामधला जो राग होता, तो सगळा सभोवतालचा राग तिथे बाहेर आला. आणि हा राग यापुढे आणखी मोठ्या प्रमाणावर बाहेर येईल. जंतरमंतरवर झालेलं आंदोलन ही फक्त सुरुवात आहे. आज हे आंदोलन शांत असेल, पण सरकारबद्दलचा राग अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात पोहोचलं आहे.
यानंतर त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. “शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी भेटले. मला वाटतं, नाशिकमधला हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असेल. प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचा आधार कार्ड तपासण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला ही गोष्टच समजली नाही की दहावी पास झाल्यानंतर आधी क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा आणि त्यानंतर क्लासच सांगणार की कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. आज विद्यार्थी कॉलेजला न जाता आठ-आठ तास क्लासमध्ये जाऊन बसतात आणि तिथे शिकतात. मग कॉलेज नेमकं काय करतं?” राज ठाकरे म्हणाले, “सगळे कोचिंग क्लासेस वाईट असतात असं नाही. पण आता हा शिक्षणाचा विषय धंदा म्हणून सुरू झाला आहे. नीटचा पेपरदेखील यांच्याचकडून फुटला ना, या कोचिंग क्लासवाल्यांकडूनच. आतापर्यंत जेवढे पेपर फुटले, ते याच कोचिंग क्लासवाल्यांकडून फुटले आहेत.
नंदन निलेकणी यांनी या क्लासेसकडे सर्वप्रथम लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, हे क्लासेस ठरवणार, ही कुठली शिक्षणपद्धती आहे? चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कॉलेजची फी 20 हजार रुपये आणि क्लासची फी एक लाख ते दीड लाख रुपये. म्हणजे क्लासेस आणि कॉलेज यांच्या संगनमताने हा सगळा प्रकार सुरू आहे. क्लासवाले कॉलेजवाल्यांना पैसे पुरवत असणार. मग विद्यार्थी आठ-आठ तास क्लासमध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये त्यांची हजेरी कशी लागते? अशी भिकार शिक्षणव्यवस्था असताना त्यानंतर तुम्ही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही? मला काही विद्यार्थी भेटले आणि त्यांनी विचारलं, ‘साहेब, परत नीटचा पेपर नाही ना फुटणार?’ हे ऐकून मला इतकं वाईट वाटलं.
यश गोसावी या मुलाने आत्महत्या केली. ज्या 21 विद्यार्थ्यांची नावं आत्महत्या केलेल्यांमध्ये आहेत, त्यामध्ये यशचं नाव नाही. तो नाशिकमधला मुलगा आहे. प्रशासनाला इतकंसुद्धा वाटत नाही की नाशिकमधला एक मुलगा, ज्याने नीट परीक्षेची संपूर्ण तयारी केली, पेपर फुटल्यानंतर व्यथित झाला, निराश झाला आणि आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर 21 विद्यार्थ्यांची नावं दिली जातात, पण त्यामध्ये 22वं नाव म्हणून त्या मुलाचं नाव देता येत नाही?”
राज ठाकरे यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील एका लेखाचा संदर्भ देत चीनच्या परीक्षा व्यवस्थेचं उदाहरण दिलं. “एक लेख आला आहे. मी तो मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी हा लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी चीन आणि भारत यांची तुलना केली आहे. खरं तर आपली आणि चीनची तुलना करू नये. मोठी लोकसंख्या हा एक मुद्दा सोडला, तर दोन्ही देशांमध्ये खूप फरक आहे. तिथे लोकशाही नाही, आपल्याकडे आहे. त्यांची राज्यव्यवस्था वेगळी आहे आणि आपली वेगळी आहे. परंतु चीनमध्ये दहावी झाल्यानंतर सर्व विद्यार्थी ‘गावकाओ’ नावाची परीक्षा देतात. भारतात यावर्षी नीटची परीक्षा 22 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी दिली, तर चीनमध्ये ‘गावकाओ’ ही परीक्षा साधारण 1 कोटी 33 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी दिली. म्हणजे भारताच्या जवळपास सहापट.
आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी त्याबाबत सहा महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. प्रश्नपत्रिका एका ठिकाणी तयार करण्यात आली, पण परीक्षा घेण्याची जबाबदारी प्रांतांवर सोपवण्यात आली. पेपर्स अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले. पेपर्स वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे सतत लक्ष ठेवण्यात आलं. त्यांना पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं. नोटा छापल्या जातात त्या दर्जाच्या उच्च-सुरक्षा छपाई केंद्रात प्रश्नपत्रिका छापण्यात आल्या. अगदी कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज व्यवस्थेवरही लक्ष ठेवण्यात आलं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्या शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार केल्या, त्यांना जवळपास महिनाभर एका सुरक्षित ठिकाणी कुठल्याही बाह्य संपर्काशिवाय ठेवण्यात आलं. संपूर्ण देश त्या परीक्षेच्या आठवड्यात सतर्क होता. विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळावं म्हणून बांधकामं थांबवण्यात आली. वाहनांच्या हॉर्नवर बंदी घालण्यात आली. विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावेत म्हणून वाहतूक वळवण्यात आली. पोलिसांनी स्वतः शटल सेवा सुरू केली. स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना मोफत ने-आण केली, पाणी दिलं, अगदी खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली. म्हणजे एका परीक्षेसाठी संपूर्ण देश कामाला लागला होता.”चीनमध्ये हुकूमशाही आहे. पण आम्ही गुणवत्तेची कदर करतो आणि प्रत्येक गुणी विद्यार्थ्याला प्रगतीची समान संधी देतो, हा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दिला. आपल्याकडे मात्र नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि इतर स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी हे या देशाचं भविष्य आहेत. पण त्या मुलांकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी पेपर फुटत आहेत. नीट आंदोलन सुरू असतानाच आणखी दोन पेपर फुटले. म्हणजे शिक्षण व्यवस्थेकडे जर कुणाचंच लक्ष नसेल, कुणीही या गोष्टी गांभीर्याने घेत नसेल, तर त्यानंतर तुम्ही म्हणणार की मुलांनी, मुलींनी चिडायचं नाही, तरुणांनी रागवायचं नाही, शिव्या द्यायच्या नाहीत? मग शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपलाच आहे का? लोकांच्या आया-बहिणी काढण्याचा अधिकार फक्त भाजपलाच आहे का? रास्त मागण्या करूनही जर सरकार दुर्लक्ष करत असेल, तर लोकांनी काय करायचं? ही फक्त सुरुवात आहे. पुढे बघा, काय काय घडतं ते.”
कोचिंग क्लासेस आणि शिक्षण व्यवस्थेवर राज ठाकरे म्हणाले की, “कॉलेजची भूमिका काय आहे? धंदेवाईक पद्धतीने उभे राहिलेले हे क्लासेस हटणार की नाहीत? सरकारची खरी कसोटी इथे लागली पाहिजे. यांच्या धंदेवाईकपणामुळेच हा सगळा प्रकार सुरू आहे. वर्तमानपत्रांना पूर्ण पानांच्या जाहिराती द्यायच्या – ‘आमच्याकडे हा पहिला आला, तो पहिला आला’ – आणि हेच लोक पेपर फोडणार. पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला तेव्हा त्याची किंमत 25 लाख रुपये होती. आता जो पेपर फुटला, त्याची किंमत दीड कोटी रुपये झाली आहे. डॉलरचा दर का वाढला, हे आता आपल्याला कळलं. या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. सगळ्यांना माहिती आहेत. पण कुणीही नियंत्रण ठेवत नाही. म्हणजे सरकारमधले कुणी यात अडकले आहेत का? कुणाचा धंदा यावर अवलंबून आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. ‘सगळं आम्हालाच कळतं’ या मानसिकतेतून सरकार ज्या दिवशी बाहेर येईल आणि तज्ज्ञांशी चर्चा करून त्यातून काही उपाय शोधेल, तेव्हाच काहीतरी बदल होईल.”
“मोहन भागवत यांनी जेन-झी पिढीशी संवाद साधायला उशीर केला. शिक्षण व्यवस्थेमध्ये जो गोंधळ आहे, तो आधी सुधारला पाहिजे. ही मुलं काय म्हणत आहेत, हे आपण समजून घेणार आहोत का? त्यांच्या आई-वडिलांना जो आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे, तो आपण समजून घेणार आहोत का? ही मुलं मोबाईलवरून इतर देशांमधली परिस्थिती पाहत आहेत. मग कोण इथे राहील? परवा मी आकडा वाचून दाखवला होता. शिक्षणासाठी पाच लाख कोटी रुपयांहून अधिक पैसा देशाबाहेर जात आहे. आपल्या देशातील पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पाच लाख कोटी रुपये परदेशात खर्च करत आहेत. म्हणजे एवढा पैसा देशाबाहेर जात आहे. सरकारमधील मंत्र्यांचीच मुलं परदेशात शिकत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांची मुलगीही परदेशात शिक्षण घेत आहे. जर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीचाच विश्वास नसेल, तर इतर मुलांचं काय?” असेही राज ठाकरे म्हणाले.
यानंतर राज ठाकरे यांनी एसआयआर (SIR) आणि मतदार यादीच्या पडताळणीवरून सरकारवर टीका केली. “अनेक ठिकाणी एसआयआरचे अधिकारी काम करत आहेत. मग त्यांच्या बरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक का फिरत आहेत? माणसं पाहून तुम्हाला मतं कापायची आहेत का? ही कुठली नवीन प्रथा सुरू केली आहे, मला समजलं नाही. पश्चिम बंगालमध्ये आणि बिहारमध्ये त्यांनी जे केलं, तेच आता महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या लोकांना आम्ही सतर्क राहण्यास सांगितलं आहे. अजून निवडणुकांना तीन वर्षे बाकी आहेत. अशा प्रकारे निवडणूक आयोग मतदार यादीची पडताळणी करू शकत नाही. मतदारांची नावं अशा पद्धतीने हटवता येत नाहीत. पण सरकारकडून कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. हे लोक निवडणुका कशा जिंकतात, तेही लोकांच्या लक्षात येईल. हा सगळा प्रकार फ्रॉड आहे. 2017 पासून मी हे बोलत आलो आहे. मी ज्यांना ज्यांना सांगितलं, त्यांना आज त्याचा अर्थ कळत आहे.”





























































