प्रासंगिक – ज्ञानियांचा महामेरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ अभिमत विद्यापीठे, शेकडो शैक्षणिक संस्था, अनेक अद्ययावत रुग्णालये, सामाजिक संस्था या सर्वांचे जनक शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील अर्थात दादासाहेब यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून व्यक्त होताना दादांचे असंख्य पैलू आणि त्याच्याशी संबंधित विविध घटना चलचित्राप्रमाणे आठवणीतून जात असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून दादांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, राजकारण आणि समाजकारण अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले.

शिक्षण क्षेत्रात तर त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींची सुरुवातच केली आहे. 1980 च्या पूर्वी फक्त सरकारी शैक्षणिक सुविधा असताना दादांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात खासगी शैक्षणिक संस्थांची सुरुवात झाली. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे 60 विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयापासून सुरुवात झालेला हा समूह आता वटवृक्ष झाला आहे. आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शिक्षण नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसहित इतरत्र पसरलेल्या संस्थांतून पूर्ण झाले आहे. अशा देदीप्यमान शिल्पकाराचा माझ्या वैयक्तिक, सामाजिक, आध्यात्मिक जडणघडणीतही मोलाचा वाटा राहिला आहे. नवी मुंबई परिसरात आज ज्या जागतिक दर्जाचे अनेक विद्यालये व सुसज्य शैक्षणिक व्यवस्था उभारली गेली त्याचे प्रमुख प्रेरणास्थान निश्चितच दादासाहेब राहिले आहेत. अनेकदा परदेशी दौऱ्यात काही महत्त्वाचे आढळल्यास ते मला भारतात परतल्यावर नक्कीच सांगायचे व अमलात आणण्याचे निर्देश द्यायचे. म्हणूनच नवी मुंबईच्या परिसरात आज भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था उभारताना जगातील सर्वोत्तम वास्तू उभा करू शकलो याचा मला आनंद होतो.

नवी मुंबईतील 1200 खाटांचे रुग्णालय उभे करत असताना दादासाहेबांनी मला सत्य साईबाबांच्या मोफत सेवा देणाऱ्या रुग्णालयास भेट देण्याची सूचना दिली. म्हणूनच इतके भव्य रुग्णालय, जागतिक दर्जांच्या सुविधा आणि तज्ञांची व्यवस्था केल्यानंतरही तेथे आज कित्येक सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात देऊ शकलो. ही बाबही दादांच्याच आशीर्वादाने पार पाडली असे वाटते.

भारतातील सर्वात प्रथम खासगी स्टेडियमच्या उभारणीची योजना जेव्हा मी दादासाहेबांच्या समोर मांडली, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता दादांनी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहनच दिले. म्हणूनच आयपीएल, आयएसएल, वुमन्स वर्ल्ड कप, अनेक जागतिक दर्जाचे मनोरंजनाचे कार्यक्रम नवी मुंबईत आयोजित करू शकलो आणि नवी मुंबईतील क्रीडा सुविधांचे नाव जागतिक पटलावर पोहोचले. ‘अहंकार म्हणजे आयुष्याचा अंत’ अशी शिकवण देणाऱ्या मानवतावादी दादासाहेबांनी राष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये प्रचंड योगदान दिले आहे. जेव्हा मी परदेशातील विद्यापीठे, रुग्णालये, हॉटेल्स, अभियांत्रिकी क्षेत्राला भेटी देतो, तेव्हा आमच्या संस्थातून शिक्षण घेऊन सर्वोच्च पदावर कार्य करीत असलेले अनेक जण भेटतात व आम्हास श्रेय देतात, पण खरे श्रेय हे दादांनी आम्हाला जे कार्य करण्याची संधी दिली आणि त्यातून आम्ही सर्वजण जे घडू शकलो त्यालाच जाते.

झपाटय़ाने वाढणाऱ्या भारताच्या प्रगतीत लागणाऱ्या उच्चशिक्षित मनुष्यबळाची गरज अनेक दशकांपूर्वी ओळखून दादांनी मलाही अशा कार्यास प्रेरित केले याचा मला आनंद होतो. दादा मला नेहमी सांगायचे, ‘‘आपण केलेल्या सत्कार्याची नोंद इतिहासाच्या पानावर कदाचित होणार नाही, पण उभारलेल्या भौगोलिक वास्तू पुणीही विसरू शकणार नाही.’’ एकदा परदेश दौऱ्यावर असताना जपान मधील टोकियो शहरातून मला पत्र पाठवून तेथील स्वच्छता, तेथील शिस्त, तेथील सुविधा याबद्दल कळवले आणि भारतात तू असे केले पाहिजे असे सांगितले म्हणूनच जागतिक दर्जाची महाविद्यालये, स्टेडियम आणि अनेक संस्था उभारू शकलो.

माझ्यासहित आम्हा सर्व पुटुंबांवर सातत्याने प्रेम, प्रेरणा आणि सर्वांगीण मदतीचा वर्षाव दादांनी केला म्हणूनच डी. वाय. पाटील समूह आज एक वटवृक्षसमान बनला आहे. त्यांचे कष्ट, जिद्द, कधीच न हार मानण्याची वृत्ती, तळागाळातील सर्वांचे भले करण्याची प्रवृत्ती आम्हा सर्वांना सतत मार्गदर्शक बनवून साथ देईल, याची मला खात्री आहे. म्हणूनच 4 ऑगस्ट 2026 रोजी दादासाहेब अनंतात विलीन झाले असले तरी माझा मात्र चालता बोलता देव, माझे विद्यापीठ हरवले आहे, अशीच जाणीव मला होत आहे, अर्थात दादासाहेबांच्या शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, समाजकारण आणि सर्वांगीण विकासाचा वारसा आम्ही सर्व कुटुंबीय अखंड चालू ठेवणार याची खात्रीही आहे.
शिक्षण, आरोग्य, क्रीडा, राजकारण आणि समाजकारणात बहुमोल योगदान दिलेले शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी आज (11 ऑगस्ट) नेरुळ येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र विजय पाटील यांनी व्यक्त केलेल्या दादासाहेब डी. वाय. पाटील यांच्या विषयीच्या आठवणी…

(लेखक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (नेरुळ नवी मुंबई) कुलपती आहेत.)