
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बॅण्ड वाजला. गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरला बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. मीडियाशी बोलत असतानाच संतोष चव्हाण नावाच्या इसमाने त्यांना मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोर चव्हाण याला अटक केली आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱया ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरला आहे. गणेशोत्सवात डीजे व मोठय़ा आवाजातील लाऊडस्पीकर्सवर बंदी घालावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. प्रत्येक व्यासपीठावर ते आपली भूमिका मांडत आहेत. गणेशोत्सव मंडळे व काही धार्मिक संघटना त्यांच्या भूमिकेला विरोध करत आहेत. मात्र तरीही बापट हे भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे पुण्यातील वातावरण तापले आहे. त्यातूनच बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला.
टिळक रोडवरील कशाळे चौकात मीडियाशी बोलत असताना संतोष चव्हाण याने बापटांना मारहाण केली. काही नागरिकांनी मध्यस्थी करून संतोष चव्हाणला तेथून दूर नेले. त्यानंतर चव्हाण मोबाईल स्वीच ऑफ करून फरार झाला होता. पोलिसांनी वेगाने तपास करत त्याला अटक केली. त्याने हे कृत्य केले याची चौकशी सुरू आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. संतोष चव्हाण याने नुकताच सोशल मीडियात एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने बापट यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
विद्यानंदला पोलीस संरक्षण द्या! आई-वडिलांची मागणी
रत्नागिरीजवळच्या गोळप गावात राहणाऱया विद्यानंद यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ‘विद्यानंदची भूमिका सर्वांच्याच हिताची आहे. वयोवृद्ध, रुग्ण व इतरही लोकांना त्रास होता नये असे त्याचे म्हणणे आहे. ते योग्यच आहे. त्याच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे,’ असे वडील सुहास बापट म्हणाले. ‘विद्यानंदवरील हल्ल्यामुळे आम्ही काळजीत होतो. आम्ही त्याच्याशी संपर्क झाल्यानंतर आमची काळजी थोडी कमी झालीय, पण त्याला पोलीस संरक्षण द्यायला हवे,’ अशी मागणी विद्यानंद यांची आई कल्पना बापट हिने केली.
बापट म्हणाले… वेडे लोक असतात हे!
‘वृत्तवाहिनीशी बोलत असताना काही टवाळखोर लोकांनी मला बोलण्यापासून थांबवले आणि मारहाण केली. त्यांना माझी भूमिका पटलेली नसावी. पण मुद्दय़ांना मुद्दय़ाने उत्तर देता येत नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केला असावा, असे बापट म्हणाले. ‘माझा गणेशोत्सवावर आक्षेप कधीच नव्हता. मी फक्त डीजेच्या आवाजाला विरोध केला होता. मला कुठलीही सवंग प्रसिद्धी नको आहे. ज्यांना ती हवी आहे ते मारहाण करत आहेत. वेडे लोक असतात हे,’ असे बापट म्हणाले.
रविवारी पालिकेवर मोर्चा
बापट यांना पाठिंबा म्हणून जागरूक नागरिकांनी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हृदयरोगतज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी ही माहिती दिली. पुणेकरांनी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
हल्लेखोर कोण आहे?
संतोष चव्हाण हा कोथरुड येथील राऊतवाडी येथे राहणारा असून प्रियदर्शनी गणेशोत्सव मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. तो जनजागृती मंडळाचा संस्थापकही आहे. त्याच्यावर याआधी पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत.
मारहाण चुकीची – मुख्यमंत्री
मारहाण योग्य नाही. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. सर्वांनी एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. असे वाद नकोत. आपण गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चंद्रकांतदादांवर टीका… यूटय़ूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील विकासकामांवर व पुणे महापालिकेच्या कारभारावर टीका केल्याप्रकरणी यूटय़ूबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री एक वाजता पंडित यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. पंडित यांच्या कुटुंबीयांनी याबाबतचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे. कोथरूडमधील विकासकामांवर बोलताना पंडित यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.





























































