
भाजपला काही ठरावीक बिल्डर मित्रांच्या घशात झोपडपट्टय़ा घालायच्या होत्या. मात्र याला झोपडपट्टीधारकांनी विरोध करीत बिल्डरांसोबत करार करण्यास विरोध केल्यामुळेच त्यांना घरे पाडण्याची नोटीस बजावून धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजप नियुक्त महापौर रितू तावडे पालिकेचे नेतृत्व करीत आहेत. त्याच पालिकेने 14 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या झोपडय़ा पाडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र आता खुद्द महापौर रितू तावडेच या प्रस्तावाला विरोध करीत आहेत. ही गोष्ट विचित्र आणि लज्जास्पद असल्याचा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. पालिकेत काय चाललेय ते तुम्हालाच माहीत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याआधीही महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 5 कोटींचा प्रस्ताव आम्ही विरोध केल्यानंतर रद्द केल्याचेही आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणले. भाजप सरकारच्या कार्यकाळात आपण सर्वजण आधीच भारताचे ‘गमावलेले दशक’ आणि देशातील नागरिकांवर होणारे त्याचे सामाजिक-आर्थिक दुष्परिणाम अनुभवत आहोत, असेही ते म्हणाले.
भाजपचे बिल्डरधार्जिणे धोरण फसले का?
महापौर असताना पालिका काय प्रस्ताव मांडतेय हे त्यांना कसे माहिती नसेल? म्हणजेच भाजपला सरकार चालवणं जमत नाही असा टोला लगावतानाच, भाजप चालवत असलेले आणि गेल्या 15 वर्षांत गोंधळात न गेलेले कोणतेही एक शहर मला दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले. भाजप आता आपला विरोध दाखवून स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.





























































