
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत म्हाडाने फेब्रुवारीत मुंबईतील 118 घरांसाठी जाहिरात काढली होती. मात्र बाजारभावापेक्षा अधिक किंमत असल्याने या योजनेतील निम्म्याहून अधिक घरे शिल्लक आहेत. त्यामुळे काही घरांच्या किमती कमी करून नव्याने या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोडतीत विक्री न झालेल्या घरांच्या देखभालीवर म्हाडाला मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागतो. प्राधिकरणाच्या धोरणानुसार, दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांची विक्री म्हाडाकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाते. मुंबईत पहिल्यांदाच लॉटरीशिवाय घरे घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे 118 घरांच्या जाहिरातीला तुफान प्रतिसाद मिळेल असे म्हाडाला वाटले होते, मात्र यातील निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे या घरांची विक्री करायची कशी, असा प्राधिकरणापुढे पेच आहे.
सोमवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेतील घरांना अपेक्षित प्रतिसाद का मिळाला नाही, याबाबत अभ्यास करून अहवाल तयार करण्याच्या सूचना म्हाडा उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच शक्य तिथे घराच्या किमती कमी करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.



























































