सिंधुदुर्गनगरीत रंगला ‘आम्ही साहित्यप्रेमी’ कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणीत ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या एकोणिसाव्या मासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओरोस खर्येवाडी (जैतापकर कॉलनी) येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या बहारदार कार्यक्रमात एकांकिका, नाटय़ स्पर्धा, मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका, वेब सीरिज, जाहिराती या क्षेत्रातील प्रवास आणि समृद्ध अनुभवांचा उलगडा करण्यात आला.

‘आम्ही साहित्यप्रेमी’ कार्यक्रमाचे समन्वयक सतीश लळीत यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी नंदकुमार ऊर्फ नंदू पाटील व जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कवयित्री डॉ. सई लळीत यांनी नंदू पाटील यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची माहिती देत परिचय करून दिला. यावेळी नंदू पाटील यांनी मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील नाटकाच्या तालमीपासून ते चित्रपटापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव सांगितला. तसेच रसिकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. या कार्यक्रमाला डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, नाना नाडकर्णी, अॅड. एन. पी. मठकर, विष्णुप्रसाद दळवी, पी. एल. कदम आदी उपस्थित होते.

तरुणांना आवाहन

सिंधुदुर्ग जिह्यातील युवक–युवतींमध्ये मोठे टॅलेंट आहे. मात्र त्यांनी केवळ एकांकिका स्पर्धांमध्ये ट्रॉफ्या गोळा करण्याच्या नादात अडकून पडून पुढच्या प्रवासाकडे दुर्लक्ष केले. ट्रॉफ्यांपलीकडे मोठे विश्व आहे. त्याला गवसणी घालावी, असे आवाहन नंदू पाटील यांनी तरुणांना केले.