
ठाण्यातील ३३ आरोग्य केंद्रांची उद्यापासून रोज झाडाझडती घेतली जाणार आहे. सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांना वेळेत, दर्जादार आणि उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात की नाही, पुरेसा औषधसाठा आहे की नाही, याचा दैनंदिन लेखाजोखा घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रत्येक केंद्राचा रोजचा रिपोर्ट त्याच दिवशी सायंकाळपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेची विविध ठिकाणी ३३ आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात दररोज हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. अनेक आरोग्य केंद्रात पुरेशा सुविधा, दर्जादार आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी ठाणे पालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीची बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक केंद्राचा रिपोर्ट महिनाअखेरीस एकत्रितपणे सादर केला जात असल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णसेवेशी संबंधित त्रुटी किंवा सुविधांची कमतरता वेळेत लक्षात येत नसल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान शहरातील ३३ आरोग्य केंद्रांच्या कामकाजावर प्रशासनाने थेट लक्ष केंद्रित केले असून दैनंदिन अहवालाची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लसीकरण, उपचार, औषधांची माहिती घेणार
प्रत्येक आरोग्य केंद्रात दिवसभरात किती रुग्ण आले, कोणत्या आजारांचे रुग्ण होते, किती जणांवर उपचार झाले तसेच बालकांचे कोणते लसीकरण झाले याची माहिती रोज घेतली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या केंद्रात औषधांचा तुटवडा किंवा रुग्णसेवेत अडचण निर्माण झाल्यास प्रशासनाला त्याची माहिती तातडीने मिळणार आहे.
डॉक्टरांच्या वर्तणुकीची तपासणी
आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रुग्णांशी वर्तणूक कशी आहे, याकडेही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. उद्दट किंवा असभ्य वर्तनाच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच डॉक्टर आणि कर्मचारी आरोग्य केंद्रात वेळेवर उपस्थित राहतात की नाही, याचीही चौकशी आता केली जाणार आहे.
* १. केंद्रांमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत की नाही आणि त्यांचा तुटवडा भासत असल्यास त्वरित पुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे.
* २. पावसाळा किंवा बदलत्या वातावरणामुळे वाढणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ राखणे, औषध फवारणी आणि संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांची पाहणी केली जाणार आहे.
* ३. काही निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘स्मार्ट आरोग्य केंद्रात’ रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. तसेच ‘आयुष्मान आरोग्य मंदिरां’च्या माध्यमातून पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्या जाणार आहेत.
दीर्घ मुक्कामाला ‘ब्रेक’
काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले असल्याचेही बैठकीत निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे रोटेशन पद्धतीने बदली करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. सहा महिन्यांनंतर बदलीची प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.




























































