
एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वेगवेगळ्या घोषणा करत असताना त्यांच्याच मतदारसंघात परिवहन कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला. मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा गेल्या 10 वर्षांपासून पगार वाढला नसल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरातील बससेवा ठप्प झाली. 600 हून अधिक कर्मचारी बंदमध्ये उतरले. त्यांनी सकाळीच बस डेपोच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. अखेर पालिका प्रशासनाच्या प्रतिनिधींनी कर्मचारी संघटनेशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा बससेवा सुरू झाली.
2015 नंतर शासनाकडून कंत्राटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झालेली नाही. परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 23 हजार रुपये मासिक वेतन मिळते. त्यामुळे वेतनवाढ मिळावी, कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, दरवर्षी किमान 10 टक्के वेतनवाढ लागू करावी तसेच प्रवासी भत्त्यात वाढ करावी, अशा प्रमुख मागण्यासाठी कर्मचारी संघटनेने आज आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सकाळपासूनच बससेवेवर परिणाम झाला. ठाणे आणि मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त प्रणाली घोंगे आणि परिवहन व्यवस्थापक दिनेश कानगुडे यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
कंत्राटदाराला बदलले
मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसगाड्यांच्या वारंवार होणाऱ्या ब्रेकडाऊनच्या समस्येवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्याची माहिती कर्मचारी संघटनेला दिली. बस दुरुस्तीचा ठेका दिलेला कंत्राटदार बदलण्यात आला असून नवीन कंत्राटदार लवकरच काम सुरू करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
वेतनवाढीसाठी शासनाला साकडे
वेतन वाढीसह इतर मागण्यांबाबत राष्ट्रीय कामगार युनियनचे निवेदन शासनाकडे पाठवण्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यानंतर कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ ठप्प झालेली मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेची बससेवा पुन्हा सुरू झाली.




























































