पालघरच्या विळंगी गावात सशस्त्र दरोडा, गोळीबार करून दागिने लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केळवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विळंगी गावात रविवारी रात्री उशिरा एका घरावर शस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी गोळीबार करत पतीपत्नीला धमकी दिली आणि सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. या दरोड्यामुळे केळवे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.

शांताराम पाटील आणि त्यांची पत्नी घरात असताना दोन सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश केला. पाटील यांचा मुलगा ऋषिकेश हा त्यावेळी कामानिमित्त घराबाहेर होता. दरोडेखोरांनी दहशत निर्माण केली. त्यानंतर हवेत तीन वेळा गोळीबार केला. तसेच धमकीही दिली. गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील दागिने घेऊन पोबारा केला.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दरोड्याची ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा तपास करत असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्या दुचाकीवरून दरोडेखोर आले होते तीदेखील चोरीची होती. या घटनेमुळे केळव्यात दहशत निर्माण झाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.