
>> अभय मिरजकर
संवाद वाढला की विश्वास वाढतो, विश्वास वाढला की सर्व प्रश्न सुटतात, असे सांगितले जाते. पोलीस म्हटले की अनेकांच्या मनात कायदा, शिस्त आणि कारवाईचे चित्र उभे राहते. मात्र, पोलिसिंगची खरी ताकद केवळ गुन्हा घडल्यानंतरच्या कारवाईत नसते. गुन्हा घडण्यापूर्वी त्याची शक्यता ओळखून प्रतिबंध करणे, समाजात विश्वास निर्माण करणे आणि नागरिकांना जागरूक करणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. याच विचारातून लातूर जिल्हा पोलीस दलाने राबविलेला ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम 1 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवला.
खाकी म्हणजे केवळ कठोर कायदा नव्हे, तर संकटात धावून येणारा विश्वासाचा हात, ही भावना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला. शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन पोलिसांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि मनातील भीती जाणून घेतली. पोलीस आपल्यापासून दूर नाहीत, तर आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव सोबत आहेत, हा विश्वास निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. आजच्या डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षिततेचे प्रश्न केवळ घर, शाळा किंवा महाविद्यालयापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. सोशल मीडिया, ऑनलाइन मैत्री, अनोळखी व्यक्तींशी संपर्क आणि सायबर फसवणूक यामुळे नव्या प्रकारची आव्हाने निर्माण झाली आहेत. याची जाणीव ठेवून पोलिसांनी मुलींना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवादाचे धोके, फसवणूक, छेडछाड, पाठलाग आणि अत्याचार याबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता तो तातडीने पालक, शिक्षक किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावा, असे आवाहन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमाच्या कालावधीत अपहरणाच्या नोंद झालेल्या गुह्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
मुलांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यास विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधणे या बाबींवरही या उपक्रमातून भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना सायबर गुह्यांपासून सावध राहण्याचे, सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याचे आणि वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर न करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला दिलेले महत्त्व अधोरेखित करणारी मोठी मोहीम आहे. राज्यासाठी दिशादर्शक असा हा उपक्रम आहे.


























































