
साधना गोरे
शून्याचा शोध भारतीयांनी लावला आणि नंतर सबंध जगाने तो स्वीकारला हे खरं असलं तरी त्या आधी विविध भागांतील संस्कृतींमध्ये ‘शून्य’ या संकल्पनेचा काहीएक विचार झालेला दिसतो. उदा. बॅबिलोनियन संस्कृती, माया संस्कृती. शून्याचा इतिहास हा केवळ त्या एका संख्येचा इतिहास नाही, तर मानवी विचारशक्तीच्या विकासाचा इतिहास आहे. एखादी गोष्ट अस्तित्वात नसतानाही तिचं अस्तित्व गणिताच्या सहाय्याने दर्शवता येतं, ही कल्पना विकसित होण्यासाठी अनेक संस्कृतींमध्ये दीर्घकाळ प्रयत्न झाले.
‘शून्य’ हा शब्द संस्कृतमधील ‘शून्यम्’ शब्दापासून तयार झाला. शून्यम् म्हणजे रिक्त किंवा रिकामे स्थान, निर्वात पोकळी, अवकाश, आकाश इ. अस्तित्वात नसलेली गोष्ट कशी मान्य करायची या पेचामुळे काही प्राचीन अभ्यासकांनी ‘शून्य’ ही संकल्पना मान्य केली नाही. काहींनी ही संकल्पना मान्य केली, पण त्यासाठी स्वतंत्र चिन्ह निर्माण केलं नाही. काहींनी उभ्या रेषा किंवा बिंदू यांसारख्या चिन्हांतून शून्य दर्शवलं. त्यातून शेवटी आताचा वाटोळा किंवा लंबगोल आकार सर्वमान्य झाला. शून्याचं हे चिन्हसुद्धा रिक्तता, निर्वात पोकळी, रिकामपण व्यक्त करणारं आहे.
भारतीय शून्याची संकल्पना अरब जगतात पोहोचली तेव्हा संस्कृत ‘शून्य’च्या अर्थानुसार अरबीत ‘Sifre’ हा शब्द वापरला गेला. या शब्दाचं मध्ययुगीन लॅटिनमध्ये ‘zephirum’ असं रूप झालं. त्यापासून इटालियन ‘zefiro’, ‘zeuero’ अशी रूपं विकसित होत ‘zero’ (झेरो) हा शब्द रूढ झाला. फ्रेंच ‘chiffre’ हाही अरबी ‘Sifre’पासूनच विकसित झाला आहे. मराठीसह, हिंदी, आसामी, गुजराती, उडिया या भाषांमध्ये ‘शून्य’ शब्द आहे; तर बंगालीमध्ये ‘शून्यो’ म्हटलं जातं. द्राविडी भाषांमध्ये शून्याशी मिळतेजुळते उच्चार आहेत – तेलुगूमध्ये ‘सुन्न’, कन्नडमध्ये ‘सोन्ने’, तामीळमध्ये ‘सुळियम/सुजियम’ किंवा ‘पूज्यम्’, मल्याळीमध्ये ‘शून्यम्’ किंवा ‘पूज्यम्’ म्हटलं जातं. फार्सीच्या प्रभावाने पंजाबीमध्ये ‘सिफर’, उर्दूत ‘सिफ्र’ म्हणतात. मराठीतही मल्याळी, तामीळप्रमाणे शून्याला ‘पूज्य’ म्हटलं जातं. स्वतःचं अस्तित्व न दाखवता दुसऱयाचं मूल्य वाढवणाऱया या अद्वितीय गुणधर्मामुळे प्राचीन गणितज्ञांनी शून्याला स्तुतीस पात्र म्हणजेच ‘पूज्य’ म्हटलं. भारतीय तत्त्वज्ञानात ’शून्य’ किंवा ’रिक्तता’ ही पूर्णत्वाची आणि मोक्षाची अवस्था मानली गेली आहे. सर्व वासना आणि अहंकार ‘शून्य’ झाल्यावर माणूस ‘पूजनीय’ बनतो, या संकल्पनेतूनही गणितीय शून्याला ‘पूज्यम्’ हे नाव मिळालं.
शून्यासोबत असणाऱया अंकांची किंमत वाढते यावरून शून्याचा अर्थ विस्तार, वाढ असाही होतो. खगोलशास्त्रातील अवकाश ही संकल्पना विस्तारणारी असल्याने तिला ‘शून्य’ म्हटलं गेलं. एखाद्याला परीक्षेत शून्य गुण मिळाले तर ‘शून्य भोपळा’ मिळाला असं सर्रास म्हटलं जातं. एकटेपणा व्यक्त करण्यासाठी ‘सुनं सुनं वाटणं’ असा शब्दप्रयोग केला जातो. ‘बधिरता’ या अर्थाने ‘सुन्न होणं’ म्हटलं जातं. शून्य ज्या अंकाच्या मागे लागते तेवढय़ा पटीत त्याची किंमत वाढते, ते अंक काढले की, तिथं रिक्तता येते. वरील शब्दप्रयोगांत हा रिक्ततेचाही भाव आहे.
संतांनी आणि कवींनी संसाराची निरर्थकता सांगताना शून्याचा वापर केला आहे. संत तुकाराम म्हणतात, ‘शून्य पडलें कुळासी। जातिगोत या नामासी। ओस पडला बाजार। अविद्येचा कारभार। अवघा झाला पांडुरंग। जो कां अद्वय अभंग। तुका म्हणे मिळोनियां। गेलों हरीचिया पाया।
संत वाङ्मयात ’शून्य’ म्हणजे ‘काहीच नाही’ असा अर्थ नसून ‘निर्गुण-निराकार अवस्था’ किंवा ‘ब्रह्मस्वरूप’ असा घेतला जातो. संत निवृत्तीनाथ म्हणतात, ‘निरालंब देव निराकार शून्य। मनाचेंही मौन हारपलें। तें रूप साबडें शंखचक्रांकित। यशोदा तें गात कृष्णनाम।’ मूलाधार चक्रापासून ते थेट सहस्रार चक्रापर्यंत (परब्रह्मापर्यंत) होणाया आत्मिक प्रवासाचं वर्णन करताना संत जनाबाई म्हणतात – ‘शून्यावरी शून्य पाहे। तयावरी शून्य आहे। प्रथम शून्य रक्तवर्ण। त्याचें नांव अधःशून्य। उर्ध्वशून्य श्वेतवर्ण। मध्य शून्य शामवर्ण। महाशून्य वर्ण नीळ। त्यांत स्वरूप केवळ। अनुहात घंटा श्रवणीं। ऐकुनी विस्मय जाहाली जनी।’ यात योगसाधना, कुंडलिनी जागृती आणि ध्यानावस्थेत येणारे अनुभव यांचं रूपकात्मक वर्णन केलं आहे.
प्रचंड एकाकी असणाऱया मनात सतत एक अनामिक हुरहुर, अस्वस्थता चालू असते, पण ती का चालू आहे याचे कारण त्या मनाला माहीत नसते आणि त्या विचारांमधून त्याला अजिबात सुटकाही मिळत नसते, हे सांगताना बालकवी म्हणतात – “शून्य मनाच्या घुमटांत, कसलें तरि घुमतें गीत, अर्थ कळेना कसलाही, विश्रांती परि त्या नाहीं’’.






























































