
हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने क्रिकेटच्या मैदानावर आपले नाव कमावले आहे. तो कसोटी संघाचा सदस्य असून संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करतो. मात्र जैसवालने आता क्रिकेटव्यतिरिक्त व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या ब्रँडचे नावही निवडले आहे. त्याने आपल्या नवीन ब्रँडचे नाव ‘वायबीजे फिट्स’ (YBJ Fits) ठेवले आहे. त्याची कंपनी कपडे आणि बॅगांचे उत्पादन करेल. या डावखुऱ्या फलंदाजाने स्वतः सोशल मीडियावर ही घोषणा केली. त्याने आपल्या ब्रँडसाठी एक पेजदेखील तयार केले आहे, जिथे त्याबद्दल माहिती दिली आहे. सध्या त्याच्या पेजवर टी-शर्ट दिसत असून लवकरच नवीन उत्पादनेही उपलब्ध होणार आहेत. त्याने कंपनीचा लोगो दाखवत ही माहिती शेअर केली.




























































