
‘‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी जनतेविरुद्ध युद्ध पुकारले आहे. सरकारची सर्व यंत्रणा वापरून विरोधकांना टार्गेट केले जात आहे,’’ असा हल्ला सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी आज मोदी-शहांवर चढवला.
आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने शुक्रवारी ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे हे आंदोलन होणार आहे. तसेच देशभरातही निदर्शने होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपके यांनी सरकारवर तोफ डागली. ‘‘अनेक विद्यार्थी संघटना, तरुण दिल्लीच्या रस्त्यावर लढत आहेत. ज्ञानेश पुमारांना हाकला एवढीच त्यांची मागणी आहे. मात्र सरकार ज्ञानेश पुमारांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा छळ करत आहे. त्यांना रस्त्यावरून फरपटत नेले. नेहा, आयशा, इशा, विराज कोणालाही सोडले नाही. ममता बॅनर्जी, केजरीवाल, विजयन या माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतले. रेल्वे, मेट्रो बंद केल्या. हे सर्व का आणि कशासाठी? फक्त एका माणसासाठी?’’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.
हिंमत असेल तर आणीबाणी घोषित करा!
मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या घोषणेवरही दीपकेंनी हल्ला चढवला. ‘‘ही केवळ घोषणा आहे. सरकारचा खरा अजेंडा ‘वन पार्टी, वन नेशन’ हा आहे,’’ असे दीपके म्हणाले. ‘‘किती दिवस तुम्ही पोलिसांच्या मागे लपून राहणार? हिंमत असेल तर आणीबाणी घोषित करा,’’ असे आव्हान त्यांनी मोदींना दिले.
सरकार घाबरले… सेंट्रल पार्क बंद केले!
जिथे आंदोलन होणार आहे ते कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली महापालिकेने रात्री उशिरा घेतला. प्रशासकीय कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. दरम्यान, सरकारने आंदोलनाला घाबरून हा निर्णय घेतल्याचा आरोप सीजेपीने केला.
पत्रकार परिषदेत अज्ञातांची घुसखोरी, गोंधळ
दीपके यांच्या पत्रकार परिषदेला नेहा बोरा, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह इतर विद्यार्थी नेतेही उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना काही अज्ञात लोक तिथे घुसले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. ‘बंद करा… इथून चालते व्हा’ अशी घोषणाबाजी हे लोक करत होते. नेहा बोरा यांनी आयोजकांना सांगून त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर वातावरण निवळले.
सीजेपीचे आंदोलन रोखण्यास हायकोर्टाचा नकार
कॉक्रोच जनता पार्टीने शुक्रवारी कॅनॉट प्लेस परिसरात पुकारलेले आंदोलन रोखण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. दिल्लीच्या पालिका बाजार येथील एका व्यापाऱ्याने या संदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तसा मनाई आदेश काढण्यास नकार देतानाच दिल्ली पोलिसांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आंदोलकांची गर्दी नियंत्रणात राहील आणि कायदा-सुव्यवस्थेला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले.


























































