जम्मू-कश्मीरात निवृत्त पोलीस अधिकाऱयाची दहशतवाद्यांकडून हत्या

गेल्या चार दिवसांपासून जम्मू-कश्मीर पेटलेलेच आहे. दहशतवाद्यांकडून रक्तरंजित हिंसाचार सुरू असून आज रविवारी बारामुल्ला जिह्यात जम्मू-कश्मीर पोलीस खात्यातील एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहम्मद शफी मीर हे गंतमुल्ला बाला भागातील स्थानिक मशिदीमध्ये नमाज पठण करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेनंतर जम्मू-कश्मीर पोलिसांनी बारामुल्ला भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ज्याठिकाणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहम्मद शफी मीर यांच्यावर गोळीबार झाला त्याठिकाणच्या परिसराची नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती कश्मीर झोन पोलिसांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.

मीर हे 2012 मध्ये एसएसपी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना वैयक्तिक सुरक्षा देण्यात आली होती, मात्र नुकतीच त्यांची ही वैयक्तिक सुरक्षा काही कारणास्तव काढून घेण्यात आली होती.

20 डिसेंबर रोजी पूंछ जिह्यात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला करत बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात तब्बल 5 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले.

शहीद जवांना आज रविवारी सैन्यदलातील जवानांकडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.