पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरेजवळ वाहनाची बिबट्याला धडक; जखमी बिबट्याला वन खात्याने उपचारासाठी पाठवले

पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे येथे एका वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेला बिबट्या मादी असून तिला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तिला ताब्यात घेण्यासाठी वनखाते व बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.

पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे (ता. आंबेगाव) हद्दीत हॉटेल जीवन जवळील असणाऱ्या पुलावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला एका वाहनाने धडक दिली. या अपघातात बिबट्या जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याला उपचाराकरिता ताब्यात घेण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू टीमला मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली. अपघातानंतर रुग्णवाहिका तात्काळ हजर झाली होती. मात्र, याच रुग्णवाहिकेखाली बिबट्या आश्रयाला जाऊन बसला होता.

त्याला ताब्यात घेण्यासाठी वनविभागाचे वनरक्षक रईस मोमीन, रेस्क्यू टीम सदस्य मनोज तळेकर, संजय शिंदे, कुणाल घुले, ऋषिकेश कोकणे, वन कर्मचारी कोंडीभाऊ डोके, विठ्ठल भेके यांना अथक प्रयत्न कारवे लागले. जखमी बिबट्याला ताब्यात घेऊन जुन्नर तालुक्यातील माणिक डोह येथे बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. हा बिबट्या हा अंदाजे अडीच वर्षाची मादी असल्याचे मोमीन यांनी सांगितले. या घटनेत बिबट मादीला पायाला व पाठीला जोरदार मार बसला असल्याचे मोमीन यांनी सांगितले.

मंचर वनपरिक्षेत्र विभागात रेस्क्यू टीम सदैव तत्पर असते. या टीमने मागील चार ते पाच वर्षात 100 च्या आसपास बिबट्या नर मादी बछडे यांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले आहे. मात्र, या ठिकाणी रस्त्यावर जखमी अवस्थेत असलेला बिबट्या रेस्क्यू करणे खूप अवघड होते. जखमी अवस्थेत असलेला बिबट्या घाबरून कधी पण कुणावरही हल्ला करू शकत होता. या घटनेत बिबट्या हा रुग्णवाहिकेच्या खाली जाऊन बसला होता तेथून त्याला ताब्यात घेणे खूप अवघड जात होते. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत बिबट्याला ताब्यात घेण्यात यश आले. आपल्यावर हल्ला होऊ नये या भीतीने रेस्क्यू टीम सदस्यांनी काळजीपूर्वक बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी पाठवून दिले. याबद्दल प्राणिमित्रांनी वनविभाग पोलीस जवान दळवी व रेस्क्यू टीम सदस्यांचे कौतुक केले आहे.