भाजप 400 पार करायला चंद्रावरून खासदार आणणार का? आदित्य ठाकरे यांचा खणखणीत सवाल

विरोधी पक्ष मांस, मच्छी, मटण खाणारा आहे असा प्रचार भाजपकडून होतोय. व्हेज-नॉनव्हेजवर बोलता, हिंमत असेल तर डेली वेजेसवर बोला, बेरोजगारीवर बोला.

भारतीय जनता पक्षाला दक्षिणेकडच्या राज्यांनी नाकारले आहे. बिहार, पश्चिम बंगालमध्येही त्यांचे काही खरे नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट आहे. मग 400 पार म्हणताहेत ते आणणार कुठून? परदेशातून आणणार की चंद्रावरून खासदार आणणार, असा खणखणीत सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

गोरेगावमधील आझाद मैदानावर आज युवा स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला गोरेगावकर आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील युवा आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ‘ही लढाई तुमच्या भवितव्याबद्दल आहे. त्यामुळे आता जिंकण्याचा निश्चय करायचा आहे,’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अजूनही महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आहेत, असे सांगताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या जुमलेगिरीवर हल्लाबोल केला. 2014 आणि 2019 ला आपल्याला वाटले होते की भाजप ही अटलबिहारी वाजपेयी यांची आहे, पण नंतर कळले की ही भारतीय जुमला पार्टी आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

ज्या मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या मैदानाचे नाव आझाद मैदान आहे. पण आजही आझाद शब्द उच्चारला की केस टाकली जाते, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या दडपशाहीवर निशाणा साधला. ही लढाई मोठी आहे असा विचार करू नका. ही लढाई तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे की अंधःकारमय आहे हे ठरवणारी आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी युवावर्गाला सांगितले. पुढची 40-50 वर्षे कशी जाणार याचा विचार करा. एखादा हुकूमशहा येऊन सांगणार का की तुम्ही कोणते कपडे आणि कोणत्या रंगाचे घालायचे, असे सांगत त्यांनी तरुण पिढीला सावध केले.

याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार विलास पोतनीस, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार कपिल पाटील यांच्यासह युवा सेना व शिवसेनेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

– आदित्य ठाकरे बोलत असताना प्रेक्षकांमधून एकाने जोरात घोषणा दिल्या आणि ओरडून सांगितले की, काहीही करा पण शिंदे गटाला दाबून टाका. मी कट्टर शिवसैनिक आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना ‘शिंदे गटाला दाबण्याची गरज नाही. कारण त्यांना आधीच भाजपने दाबला आहे,’ असे सांगितले.

मिंध्यांची नक्कल करताच हास्याचे फवारे
मिंधे गटाचा समाचार घेताना एकनाथ शिंदे यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. निवडणूक लढताना मिंध्यांनी सांगितले होते की, आम्ही 22-25 जागा लढणार आहोत. मी एकालाही हरू देणार नाही… एक जरी हरला तर मी राजीनामा देईन, असे आदित्य ठाकरे म्हणताच एकच हशा पिकला. मिंध्यांना महायुतीमध्ये 9 जागा मिळाल्या आणि त्यातील 5 जागा भाजपने बदलायला लावल्या. नाशिक आणि अन्य ठिकाणीही तशीच परिस्थिती आहे. ज्यांना दिली साथ, त्यांनीच केला घात, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पीएम केअर फंडाचा खर्चही जाहीर करा
कोविडमध्ये घोटाळा केल्याचे कारण सांगून भाजपने युवा सेनेच्या पदाधिकाऱयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कोविड नियंत्रणासाठी कुठे-कुठे खर्च केला गेला ते वाचून दाखवा आणि पीएम केअर फंडातून त्यावेळी कुठे खर्च केला तेसुद्धा समोरासमोर वाचून दाखवा, असे आव्हान दिले. केसेस वाढत आहेत, मजूर घाबरले आहेत, त्यांच्यासाठी विशेष गाडय़ा सोडा असी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना विनंती करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता, याचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी यावेळी करून दिली.