मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना दडपशाहीने मिठागरांवर वसवण्याचा भाजपचा डाव; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघाचे उमेदवार पियूष गोयल यांनी भाजपला मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची असून तेथील लोकांना ते मिठागराच्या जागेत हलवणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या या योजनेचा भंडाफोड करत हल्लाबोल केला.

”मुंबईत अनेक ठिकाणी झोपडपट्टी पूनर्वसन योजना मार्गी लागल्या आहेत. काही ठिकाणी यशस्वी आहे. काही ठिकाणी प्रक्रीया चालू आहे. लोकांच्या परवानगीशिवाय काही होऊ शकत नाही. हे बिल्डर, एसआरए व सरकारला माहित आहे. केंद्र सरकारला दहा वर्ष होत आहेत. या दहा वर्षात हुकुमशाही वाढत गेली आहे. हे सगळं होत असताना आता सरकार एक भीतीदायक योजना शहरात आणत आहे. ही योजना धोकादायक आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचे रोजगार आजूबाजूलाच असतात. त्यांना मिठागारात हलवायचं हा प्लॅन भाजपसमोर आलेला आहे. हे तेच मंत्री आहेत. आमचं सरकार असताना ज्यांच्याकडे मिठागर होतं. आम्ही त्यावेळी मुंबई मेट्रोचं कारशेड कांजूरमार्गला मागत होतो. आमच्या त्या प्रस्तावाने मुंबईचे दहा हजार कोटी वाचवून चार मेट्रोचं कारशेड एकाच ठिकाणी झालं असतं. तेव्हा यांच्याच खात्याने आमच्या प्रस्तावाला विरोध केलेला. आमचं काम रखडवलं. आमचं सरकार पाडल्यानंतर यांनी कारशेड आरेला आणलं. त्यानंतर आता मेट्रो सहाचं कारशेड कांजूरमार्ग इथेच बनवलं जातंय. या सरकारचं कामंच असं आहे. मिठागराचं खोटं सांगून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकायचा, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”मुंबईबद्दल असे विचार करणारे हे मंत्रीमहोदय आता मुंबई उत्तरचे उमेदवार झालेले आहेत. आता त्यांनी ही योजना लोकांसमोर बोलून दाखवली. आता ते सारवा सारव करतील. पण शेवटी तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही बोलून दाखवले आहे. उद्या हा विषय मागेही घेऊ शकता. अनेक वेळा भाजपकडून वचनं दिली गेली आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्यात येणार होती. ते वचन पूर्ण झालेलं नाही. मुंबईत 2017 ला फॉर्म वाटलेले त्या फॉर्मचं काही झालेलं नाही. जागच्या जागी रिडेव्हलपमेंटचं आश्वासन यांनी जुहू एअरपोर्टजवळील लोकांना दिलेलं. आता 6 ते 7 वर्षांनी यांनी तिथेच पुर्नविकास शक्य नसल्याचे सांगितले आहे. अशी यांची वचनं असतात’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारकडून व साडे आठ वर्ष सरकारमध्ये असलेल्या राज्य सरकारकडून सतत मुंबईचा अपमानच झालेला आहे. मुंबई देशाचे आर्थिक चक्र असल्याच्या आत्मविश्वासाला भाजपने ठेच पोहोचवली आहे. इथले सर्व उद्योगधंदे हे त्यांच्या आवडत्या राज्यात हलवले जात आहेत. मुंबईची आर्थिक कोंडी सुरू आहे. मुंबई यांना झोपडपट्टी मुक्त बनवायीच आहे मात्र त्यासाठी सगळ्या झोपडवासियांना त्यांच्या मूळ जागेवरून हलवून मिठागरात टाकायचे आहे. धारावीचे देखील तसेच आहे. सगळ्या महत्त्वाच्या जागा भाजपच्या मित्रांना द्यायच्या व गरिब झोपडपट्टी धारकांना मिठागरात पाठवायचे. भाजपची निती गरिबी हटाओ नाही गरिब हटाओ अशी आहे. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही वरळीत बीडीडी चाळ असो नामं जोशी मार्ग वरील बीडीडी असो यांचा पुर्नविकास केला. आता त्यांची काम अर्ध्यापर्यंत आलेली आहेत. विकास होऊ शकतो. विकासादरम्यान कुणाला बेघर करणं त्याला आमचा विरोध आहे. गरिबांचा आवाज न ऐकणे ही हुकुमशाही आहे. मुंबईत लाखो जनता मजदूर आहे. विकसित भारत हे जे दाखवत आहेत. त्यात या मजदूरांचा मोठा हात आहे. जर या भाजपचं स्वप्न असेल की या मजदूरांना मिठागारात टाकू तर ही हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही , असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

”आज देशात महागाई वाढतेय, बेरोजगारीचा रेकॉ़र्ड झालाय. अशा वेळी मजुरांना बेघर करणं, त्यांची स्वप्न तोडणं हे चुकीचं आहे. यांचे हे सूट बुटाचं सरकार आहे. हे आता लोकांसमोर आलं आहे. स्लममधील लोकांनी भाजपचे इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले नाहीत त्यामुळे त्यांना बेघर केले जातय. मिठागरं ही नो डेव्हलपमेंट लँड आहे. त्याला देखील आता यांनी सोडलं नाही. मिठागरं आणि मुंबईतील मोक्याच्या जागा आपल्या उद्योगपती मित्रांच्या हातात द्यायचं. हेच याचं काम आहे. भाजपला गरिबांचा आवाज दाबायचा आहे. राहुल नार्वेकर यांनी संविधानाची मोडतोड करून चुकीचा निर्णय दिला. एक यांचे नेते म्हणतात की 400 सीट आल्यावर संविधान बदलणार. संविधान बदलून गरिबांचा आवाज हे दाबू पाहत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.