‘जय भवानी, जय शिवाजी’ वगळण्याचे फर्मान म्हणजे महाराष्ट्र द्वेषच! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

शिवसेनेच्या ‘मशाल’ गीतातून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ हे शब्द वगळण्याचे निवडणूक आयोगाचे फर्मान हा एक प्रकारे महाराष्ट्र द्वेषच असल्याचे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे. जनशक्ती आमच्यासोबत असून शिवसेनेशी गद्दारी करणारांना गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी बजावले.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे हे आज शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या चाटूगिरीवर कडाडून टीका केली. शिवसेनच्या ‘मशाल’ गीतातून ‘हिंदू धर्म’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही नावे काढणे हा महाराष्ट्र द्वेषच असल्याचे ते म्हणाले. हे दोन्ही शब्द वगळण्याचे फर्मान आम्ही धुडकावून लावत असून, या गाण्यातून ते शब्द कदापि काढले जाणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

आमच्यासोबत लोक आहेत, जनशक्ती आहे. त्यांच्या बळावर आम्ही शिवसेनेशी गद्दारी करणारांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी बजावले. ज्यांना सर्व काही दिले, तेच गद्दारी करून पळाले, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातला पळवले जात असताना हे सगळे मिठाची गुळणी धरून बसले होते, असा आरोपही त्यांनी केला.