बँक घोटाळ्यातील आरोपीचा भाजपात प्रवेश; मुनगंटीवारांनी केलं स्वागत

manohar-paunkar

अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरती प्रकरणात फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे भाजपवासी झालेत. देवतळे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला किती फायदा होणार, याची चर्चा अद्याप संपलेली नसताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी सोमवारी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकला आहे.

बँकेच्या बोगस नोकर भरती घोटाळा प्रकरणातील ते आरोपी होते. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात ते तीन महिने कारागृहाची हवा खाऊन आले. अशा व्यक्तीला भाजपने प्रवेश देवून काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ज्यांनी भ्रष्टाचार केला, गैरव्यवहार केले, अशा नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना संरक्षण देण्याचे काम राष्ट्रीय पातळीवर सुरू असतानाच त्याचे लोण आता जिल्हा पातळीवरही पोचल्याचे यातून दिसले. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न अनेक पक्ष करतात. अशाच हेतूने त्यांना भाजपनं पक्षात घेतल्याचं बोललं जात आहे.

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेत ऑक्टोबर 2019 च्या नंतर अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही भरती करताना उमेदवाराकडून प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र मागवण्यात आलं होतं. पण हे प्रमाणपत्र अनेकांनी सदोष सादर केलं होतं. त्यात तांत्रिक त्रुटी होत्या. असं असतानाही 24 उमेदवारांची भरती करण्यात आल्याचा आरोप करीत संदीप गड्डमवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत बँकेची फसवणूक करण्यात आली, असं म्हटलं होतं. तक्रारीचा आधारे पोलिसांनी कलम 420, 471, 37 अन्वये अध्यक्ष पाऊणकर आणि सरव्यवस्थापक एस. एन. दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.