केरळमध्ये आढळला कोरोनाचा ‘JN.1’ हा नवा व्हेरियंट, लसीकरण झालेल्यांनाही धोका; रुग्णसंख्या 1324 वर

गेला… गेला… म्हणता म्हणता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत असतानाच आता नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट आढळला आहे. बीए.286 या जातीतील जेएन.1 हा विषाणू असल्याची माहिती असून या विषाणूच्या संसर्गाची चिंता निर्माण झाली आहे.

केरळमध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या जेएन.1 या सब-व्हेरियंटचे प्रकरण आढळून आले आहे. 8 डिसेंबर रोजी तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील काराकुलम येथे आरटी-पीसीआर चाचणीवेळी हा प्रकार आढळून आला आहे. 18 नोव्हेंबर रोजी 79 वर्षीय महिलेलाला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर हा कोरोनाचा नवा व्हेरियंट असल्याचे उघड झाले. मात्र योग्य उपचारामुळे महिला ठणठणीत झाली असून तिला घरीही सोडण्यात आले आहे.

जेएन.1 या सब-व्हेरियंटचा लसीकरण झालेल्यांनाही धोका असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हेरियंट अमेरिकेमध्ये सप्टेंबर 2023मध्ये पहिल्यांदा आढळला होता. हा विषाणू वेगाने पसरत असला तरी याची तिव्रती कमी आहे. पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा असल्याची माहिती, नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनने कोविड टास्क फोर्सचे सहअध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिली.

दरम्यान, देशात 7 महिन्यांच्या अंतराने कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक वाढ केरळमध्ये नोंदवण्यात आली असून येथील कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा 1324 वर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले असून परिस्थितीवर नजर ठेऊन आहे.