नगरमध्ये बनावट पदव्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक; दोघांवर गुन्हा

नगर शहरातील बालिकाश्रम परिसरात गेल्या काही दिवसांपासून बनावट पदव्या व गुणपत्रके 50 ते 60 हजारांना विकणाऱया रॅकेटचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी एकाला पकडण्यात आले असून, त्याच्याकडून दहावी व बारावीची बनावट गुणपत्रके व पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत. या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

अशोक नामदेव सोनवणे (वय 37, रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर, भिंगार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, सचिन शर्मा व चेतन शर्मा (दोघे रा. दिल्ली) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विशाल बाजीराव पारधे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, बालिकाश्रम रोडवर न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागील बाजूस रुद्र एज्युकेशन सोसायटीचे पॅरामेडिकल कॉलेज आहे. हे कॉलेज अशोक सोनवणे चालवितो. त्याने सात हजार रुपयांसह ‘डीएमएलटी’ची कागदपत्रे घेतली. कोरोना संसर्गाचे कारण सांगून बी.एस्सी. एमएलटी पदवीचे बनावट प्रमाणपत्र दिले. याबाबत विशाल पारधे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अशोक सोनवणे याला गुरुवारी (13 रोजी) चौकशीसाठी बोलावून घेतले.

ही चौकशी सुरू असताना अशोक सोनवणे याच्या मोबाईलवर फोन आला असता, सोनवणे गडबडला. त्यामुळे पोलिसांनी ‘कोणाचा फोन आहे?’ असे विचारले असता, त्याने ‘डीटीडीसी कुरियरमधून फोन आला आहे,’ असे सांगितले. त्यावर त्याला ‘कशाचे कुरियर आले?’ अशी विचारणा करता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांना त्याची शंका आल्याने त्यांनी ती बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना कळविली. त्यांनी पोलीस कर्मचाऱयांना सोनवणे याच्यासोबत कुरियर ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करण्यास सांगितले.

पोलिसांनी सोनवणे याच्यासह जाऊन कुरियर ताब्यात घेतले. ते कुरियर उघडून पाहिले असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडील इयत्ता दहावी व बारावीची गुणपत्रके आढळली. या गुणपत्रकांबाबत सोनवणे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ती गुणपत्रके दिल्ली येथील सचिन व चेतन शर्मा यांच्याकडून घेतल्याचे त्याने मान्य केले. तसेच या गुणपत्रकांसोबत तो अनेक विद्यापीठांच्या बनावट पदव्या 50 ते 60 हजार रुपयांमध्ये देत असल्याचे सांगितले. पोलिसांनी अशोक सोनवणे याला ताब्यात घेत त्याच्याकडील 50 हजारांचे मोबाईल जप्त केले. सोनवणे याने आणखी कोणाला अशा पदव्या व बनावट गुणपत्रके दिली आहेत, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

60 हजार रुपयांत बनावट पदव्या, गुणपत्रिकांची विक्री

अशोक सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यासोबत अनेक नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या व गुणपत्रिका 50 ते 60 हजार रुपयांत विकल्याचे सांगितले.

बनावट प्रमाणपत्रामध्ये अजून कोण सामील?

सोनवणे याने दिल्ली येथील सचिन शर्मा व चेतन शर्मा यांच्याकडून बनावट गुणपत्रके व पदवीची प्रमाणपत्रे घेतल्याचे सांगितले. पोलीस त्या दोघांचा तपास करीत असून, सोनवणे याच्यासोबत यात अजून कोणी आहेत का, याचा तपास करीत आहेत.