अजित पवार उपमुख्यमंत्री; शिंदे जाणार हे नक्की!

पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर अजित पवार आज भरदुपारचा मुहूर्त गाठत मिंधे सरकारमध्ये सामील झाले आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादा सरकारमध्ये ‘इन’ झाल्याने आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून ‘आऊट’ होणार हे नक्की झाले. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार सरकारमध्ये गेले हे निश्चित नसले तरी 16 मिंध्यांवर लवकरच अपात्रतेची टांगती तलवार कोसळणार आणि नंतर सरकार कोसळू नये म्हणून भाजपने केलेली ही बेगमी असल्याचे मानले जाते. राज्यपाल रमेश बैस यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम यांनाही मंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवार केवळ आठजणांनाच आपल्यासोबत घेऊन गेले नाहीत तर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि पक्षाचे खजिनदार, खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे यांनाही घेऊन गेले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची दुपार राष्ट्रवादी काँग्रेसला मारक ठरली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या गळाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा जाहीर आरोप केला होता. त्या घोटाळय़ातील सूत्रधारांचा त्यात समावेश आहे. अठरा महिने तुरुंगात राहावे लागलेल्या छगन भुजबळ यांच्यासह ईडीचे शुल्ककाष्ठ मागे लागलेले हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे मिंधे सरकारमध्ये सहभागी झाले. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेले प्रफुल्ल पटेलही या टीमसोबत होते.

राज्याचा विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल -एकनाथ शिंदे

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आज आणखी एक इंजिन जोडले आहे. त्यामुळे आता सरकार ट्रिपल इंजिनाचे झाले आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शरद पवारांसोबत कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, फौजिया खान, आमदार रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, अंकुश काकडे, सोनिया दुहान हे शिलेदार शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. ‘आम्ही साहेबांसोबत’ म्हणत या सर्वांनी पवार यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड

अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासांच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. तसेच विधिमंडळाच्या प्रतोदपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे प्रतोदपद अनिल पाटील यांच्याकडे होते. अनिल पाटील यांनी अजित पवारांसह बंडखोरी केल्याने त्या पदावरही पुनर्नियुक्ती गरजेची होती. माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद जो व्हिप काढेल तोच लागू होईल, असे आव्हाडांनी स्पष्ट केले.

तीन बंगले,तीन बैठका

या बंडखोरीची योजना लोणावळा येथील बैठकीत आखली गेल्याचे सांगण्यात येते. शनिवारी रात्री तेथे बैठक झाली आणि रविवारी सकाळी अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठकीचा दुसरा अंक सुरू झाला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मिंधे गटाची तर देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपची बैठक सुरू होती. अर्थात ‘देवगिरी’ आणि ‘सागर’ या दोघांमध्येच सुरुवातीचा मोबाईलवरील थेट संपर्क होता. नंतर ‘वर्षा’ला निर्णय सांगण्यात आला. तिन्ही बैठका एकाच वेळी संपल्या आणि तिन्ही ठिकाणांहून एकाच वेळी गाडय़ांचा ताफा राजभवनाच्या दिशेने रवाना झाला.

शिंदे मोबाईलमध्ये, आमदार टेन्शनमध्ये

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱयांचा सरकारप्रवेश हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बिलकुल पटलेला नाही हेच आज त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसून येत होते. शपथविधी सोहळय़ात शिंदे त्यांच्या मोबाईलमध्ये मग्न होते, तर दुसरीकडे शिंदे गटातील आणि भाजपमधील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आमदार ‘आता आमच्या मंत्रीपदाचे काय’ म्हणत टेन्शनमध्ये होते.

नांदा सौख्य भरे!

अजित पवार यांचा बंडखोर गट, शिंदे गट आणि भाजपच्या नव्या संसारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली. ‘नांदा सौख्य भरे’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दिवसभरातील घटनाक्रमावर टिप्पणी केली.

लोकशाहीचे वस्त्रहरण

महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असून सत्तापिपासू भाजपने तोडपह्डीचे महाभारत केले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपचा विकृत पॅटर्न असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरू आहे. एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार असल्यामुळेच हे घडवले गेले, असे पटोले म्हणाले.