आम्हीच राष्ट्रवादी! अजित पवार यांचा पक्षावर दावा

अजित पवार यांनी शपथविधी उरकल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेतली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. पक्षातील बहुतेकांना आमचा निर्णय मान्य आहे. जवळपास सर्वच आमदार आमच्यासोबत आहेत. आज आम्ही 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात आमचे आणखी काही मंत्री शपथ घेतील, असा दावा अजित पवार यांनी केला.

अलीकडेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रफुल्ल पटेल आणि आज मंत्रिपदाची शपथ घेणारे छगन भुजबळ पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यासोबत होते. भाजप आणि शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेण्याचे कारण सांगताना अजित पवार यांनी थेट देशाच्या स्वातंत्र्यापासूनच्या नेतृत्वांचा दाखला दिला. अनेक वर्षांच्या पोकळीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व देशाला मिळाले आहे आणि देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीचा विचार करून विकासासाठी आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपद शुक्रवारी सोडले

अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदाबाबत पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी अधिक बोलणे त्यांनी टाळले.

भाजपसोबत जाण्याबाबत अनेक दिवस चर्चा

आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही जाऊ शकतो. नागालँडमध्ये याआधीच पक्षाने भाजपसोबत युती केलेली आहे. तोच निर्णय आता महाराष्ट्रात घेतला आहे. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत आणि पक्षाची निशाणी घडय़ाळ असून येणाऱया लोकसभा आणि विधानसभेला आम्ही भाजपसोबत आघाडी करून निवडणुका लढणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. भाजपसोबत जाण्याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती, असेही ते म्हणाले.

भुजबळ म्हणतात, कुणावर गुन्हे आहेत सांगा!

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावरून पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर छगन भुजबळ यांनी सारवासारव केली. गुन्हे दाखल आहेत म्हणून कारवाईच्या भीतीने हे गेले असे आरोप होत आहेत, पण कोणावर गुन्हे दाखल आहेत सांगा, असा उलट प्रश्न भुजबळ यांनी केला. अजितदादांवरील आरोप हटवले गेले. माझ्यावरची महत्त्वाची केस आहे, ती सुटली. हसन मुश्रीफ यांच्यावर खटला सुरू आहे, पण अद्याप आरोप ठेवलेला नाही वा कुठलीही कठोर कारवाई कोर्टाकडून झालेली नाही. त्यांच्याविरोधात ठोस काही सापडलेले नाही. दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मराव बाबा अत्राम, संजय बनसोडे या कुणावरही केस नाही. त्यामुळे उगाच बालंट लावू नका, असे भुजबळ म्हणाले. आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. तिसरा घटक म्हणून सरकारमध्ये सहभागी झालोत, असेही त्यांनी नमूद केले. 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आपण सकारात्मक विचार केला पाहिजे, असे शरद पवार काही दिवसांपूर्वी आम्हाला म्हणाले होते, असा दावाही भुजबळ यांनी केला.

शरद पवारांचे नाव टाळले

शरद पवार यांना या सर्वाची कल्पना आहे का, असे विचारले असता आम्हाला पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे मोघम उत्तर अजित पवार यांनी दिले. शरद पवार यांचा उल्लेख त्यांनी टाळला. तुमच्यासोबत किती आमदार आहेत असे विचारले असता बहुतेक सर्वच आमदार तसेच नेते आणि कार्यकर्तेही आमच्यासोबत असून लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे, असे विधानही त्यांनी केले.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करणारे अजित पवार आणि अन्य नेत्यांविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. दुपारी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर जमले होते. तिथे लावण्यात आलेल्या पोस्टरवरील अजित पवार आणि अन्य बंडखोर नेत्यांच्या पह्टोंना काळे फासून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. यावेळी बंडखोरांविरुद्ध तीव्र निदर्शनेही करण्यात आली.

मी पवार साहेबांबरोबर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठे आणि कुणासोबत आहेत, अशी चर्चा सुरू होती. मात्र सायंकाळी सव्वापाच वाजता ट्विटरच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांच्यासोबतचा पह्टो पोस्ट करत ‘मी साहेबांबरोबर,’ असे पाटील म्हणाले.