आळंदी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान सोहळ्यास प्रारंभ

आळंदी येथील सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वै. त्यागमूर्ती ह.भ.प.जयराम बाबा भोसले महाराज आळंदीकर यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त 24 एप्रिल ते 1 मे 2024 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात हरिनाम गजरात आयोजन करण्यात आले आहे. प्रथापरंपरांचे पालन करीत सप्ताहास उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

वै.जयराम बाबा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने या सप्ताहात नित्यपाठ, गाथा भजन, हरिपाठ, राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार असल्याचे युवा कीर्तनकार ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी सांगितले. या सप्ताह अंतर्गत ज्ञानयज्ञ सोहळ्यास भाविक, भक्त, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सप्ताह प्रारंभ दिनी बाळासाहेब महाराज शेवाळे, अर्जुन मेदनकर, शिवाजी भोसले, पांडुरंग वहिले, पांडुरंग राजूरकर, माऊली महाराज दास, अनिल महाराज तापकीर, नागरगोजे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जयराम महाराज भोसले यांचे समाधी मंदिर पूजा, अभिषेक, दर्शनास भाविकांनी गर्दी केली.

नामवंत कीर्तनकारांमध्ये ह.भ.प.शंकर महाराज मराठे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज करंजीकर, ह.भ.प. शशिकांत महाराज राऊत, ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे, ह.भ.प. निवृत्ती महाराज गलांडे, ह.भ.प. केदारनाथ महाराज शास्त्री यांची कीर्तन सेवा होत आहे. ह.भ.प.अशोक महाराज पांचाळ यांचे काल्याचे कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्यात गायन-वादनासह हरीजागर,अन्नदान महाप्रसाद वाटप परंपरेने होणार आहे. भाविकांनी श्रींचे दर्शनासह श्रवण सुखाचे ज्ञानदान यज्ञाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज शेवाळे यांनी केले आहे. कीर्तन साथ व सांगायक, वादक वृंद आळंदीतील कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था, जयराम बाबा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचे आजी, माजी विध्यार्थी वृंद देणार असल्याचे रवींद्र महाराज गाडेकर यांनी सांगितले.