धमक्या येतात तर पोलिसात जा, अंबादास दानवे यांचा भुजबळांना टोला

ambadas-danve

गोळी घालू अशा धमक्या येत आहेत असे म्हणणाऱया मंत्र्याने पोलिसात जावे, उगीच मराठा आंदोलनाला बदनाम करू नये, अशी ठाम भूमिका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता मांडली.

गोळी घालण्याच्या धमक्या आल्याचे छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले होते. अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत 289 अन्वये सूचना मांडून हा मुद्दा चर्चेत आणला. घटनेनुसार मंत्रिमंडळाचा जो निर्णय होतो त्यात मतभेद होऊ शकतात. पण निर्णय झाल्यानंतर त्यामागे सर्व मंत्र्यांनी खंबीरपणे उभे रहायला हवे. पण एक मंत्री तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कुणी गोळी घालीन असे म्हणत आहे तर त्यांनी पोलिसात तक्रार केली पाहिजे. मराठा आंदोलनाला बदनाम करू नये. पण आरक्षणासाठी धमक्या दिल्या जाताहेत असे सांगितले जात आहे, असे दानवे म्हणाले. सरकारमधील पॅबिनेट मंत्र्यांना धमक्या येतात तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल करतानाच राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा असल्याने यावर सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी दानवे यांनी केली.

हल्ली प्रत्येकालाच धमक्या येताहेत – नीलम गोऱहे

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांनी दानवे यांच्या या सूचनेनंतर बोलताना सांगितले की, ‘हल्ली प्रत्येकाला धमक्या येतात. फोन करून आरक्षणाबाबत बोलतात. काल एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, एका महिलेवर बलात्कार झालाय, पण तिला तुम्ही विधान भवनात प्रवेश करू देत नाही. मी म्हटले बलात्कार झालाय तर तिने पोलिसात किंवा रुग्णालयात जायला हवे. पण नंतर कळले की केवळ आतमध्ये यायला पास हवा होता म्हणून ती व्यक्ती असे बोलत होती.’

सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळेच आरक्षण रखडलेय – एकनाथ खडसे

विद्यमान राज्य सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळेच मराठा आरक्षण रखडले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत केला. मराठय़ांना आरक्षण द्यायचे असेल तर सरकारने पेंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस केली पाहिजे आणि त्या शिफारशीवरून पेंद्र सरकारने घटनेत तशी दुरुस्ती केली पाहिजे, असा सल्लाही खडसे यांनी दिला.