सत्तेकरिता भाजप नीच गलिच्छ राजकारण करीत आहे – माजी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते

केवळ सत्ता मिळवण्याकरिता भारतीय जनता पार्टी  नीच व गलिच्छ राजकारण करीत आहे. आपले राजकीय विरोधाक पक्ष संपवण्याकरिता व कायम सत्तेत राहण्याकरिता भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी फोडुन सुसंस्कृत महाराष्ट्राला गलिच्छ राजकारणाचा कालीमा फासला आहे. भाजपने सुरु केलेल्या फोड़ाफोडीचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रातील जनतेला मुळीच मान्य नाही. आगामी निवडणूकांमध्ये सुज्ञ मतदार भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, तसेच गद्दारांची परवा आपल्याला करायची गरज नाही कारण त्यांना जनता गाढल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी पेण येथे आयोजित शिवसेना मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात केले. यावेळी मिंदे गटाचे युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, अमित टवरी, (टिपू)सुलतान साटी, अमित पाटील, किशोर मोहिते, सागर पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर मध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी पुढे बोलताना अनंत गीते म्हणाले की मिंदे सरकार निवडणुकीला घाबरत आहे. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायत आदींची मुदत संपून जवळजवळ दोन वर्ष झाली असताना देखील ते निवडणूका घेत नाहीत कारण मतदारांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकड़े असणारा कौल आहे. यामुळे मिंधे आणि भाजप यांना धड़की भरली आहे.  अनेक ठिकाणी प्रशासक राज्य करत आहेत. त्यामुळे राज्यात भाजप शिंदे सरकार नसून प्रशासकांचे राज्य आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर यांच्या मागणीनुसार पेण विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार हा शिवसेनेचीच असेल तसेच विधानसभेसह पेण नगर परिषदेवरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये  होणार आहेत. या पैकी एकही राज्यात भाजप सत्तेवर येणार नाही. भाजपची जी अवस्था कर्नाटकात झाली तीच अवस्था या पाच राज्यांमध्ये होणार आहे. आणि महाराष्ट्रात भाजपचे 60 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.

 येत्या 17 मे ला लोकसभेची मुदतही संपत आहे त्यामुळे 17 मे 2024 ला नवीन लोकसभा गठित होणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या घटनेत किंवा कुठेही लोकसभा पुढे ढकलण्याची तरतूद नाही. कोणी कितीही मनात आणलं तरी बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे हुकूमशाही या देशावर राज्य करू शकत नाही. लोकसभा 17 मे पूर्वी गठीत व्हायची आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आगामी सर्व निवडणुका शिवसेना इंडियाच्या माध्यमातून एकत्रितपणे लढणार असून या निवडणुकीमध्ये इंडियाचा विजय निश्चित आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.