मिंधे सरकारच्या कंत्राटी नोकर भरतीविरोधात संताप; रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका

कोणतेही आरक्षण न ठेवता 75 हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय मिंधे सरकारने घेतला आहे. त्याविरोधात सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सरकारी कर्मचारी या निर्णयाविरोधात शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. काँग्रेस पक्षानेही या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

सरकारने अतिशय गांभीर्याने विचारविनिमय करून कंत्राटी पद्धतीने भरती सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या ऐतिहासिक अशा कंत्राटी भरतीसाठी सरकारने नऊ खाजगी कंपन्यांची निवड केली आहे.या ऐतिहासिक भरतीसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्या कोणाच्या आहेत? त्या कंपन्या कोणत्या पक्षाच्या नेत्यांशी निगडीत आहे? हे माहितीय का? माहित असेल तर कमेंट करा, अशी पोस्ट शेअर करत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

नोकरी मिळावी म्हणून आरक्षणासाठी विविध समाजांची आंदोलने सुरू आहेत. मिंधे सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा घाट घातला आहे. सरकारी अधिकाऱ्यांसह कार्यालयातील सर्वच पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी 6 सप्टेंबर 2023 रोजी नऊ कंपन्यांना ठेका दिला आहे. त्यात भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिला आहे.