नाट्यरंग – नाट्यत्रयीचा श्राव्यानुभव

>> हिमांशू भूषण स्मार्त

संवादांच्या श्राव्यात आशयाचे आणि भाषेचे अंग परस्परांमध्ये विरघळून सामावलेले असते. भाषेने जसे श्राव्याला रूप येते तसे आशयालाही एक रूप येते. जितकी पात्रे अधिक, जितका नाटकाचा कालिक पल्ला, श्राव्याचा पल्ला आणि व्यामिश्रता-विविधता-वैपुल्य अधिक. महेश एलकुंचवारांची ‘वाडा चिरेबंदी-मग्न तळ्याकाठी-युगान्त’ ही नाट्यत्रयी अशाच श्राव्याच्या पुष्कळतेने समृद्ध झालेली आहे.

नाटकात श्राव्याच्या असंख्य तऱहा असतात. पात्रांमुखी असणाऱया संवादांचे श्राव्य, ही त्यातली सर्वात ठसठशीत तऱहा. या श्राव्याला, नटाच्या आवाजाच्या, पात्रांच्या आवाजाच्या, भाव-विचार स्थितीच्या, वाक्यविन्यासाच्या, शब्दसामग्रीच्या तऱहा प्राप्त असतात. नाटय़संवादांना एक अंग आशयाचे असते. दुसरे अंग असते भाषेचे. संवादांच्या श्राव्यात आशयाचे आणि भाषेचे अंग परस्परांमध्ये विरघळून सामावलेले असते. भाषेने जसे श्राव्याला रूप येते तसे आशयालाही एक रूप येते. पुन्हा जितकी पात्रे अधिक, जितका नाटकाचा कालिक पल्ला अधिक, तितका श्राव्याचा पल्ला आणि व्यामिश्रता-विविधता-वैपुल्य अधिक. या भाषिक श्राव्यासोबत अभाषिक श्राव्य असते. मानवी श्राव्यासोबत मानवेतर श्राव्य असते. नाटक जितके दिसण्यात असते तितकेच ते ऐकू येण्यात असते. महेश एलकुंचवारांची ‘वाडा चिरेबंदी-मग्न तळ्याकाठी-युगान्त’ ही नाटय़त्रयी अशाच श्राव्याच्या पुष्कळतेने समृद्ध झालेली आहे. या नाट्यत्रयीच्या नाटकीयतेमध्ये तिच्या श्राव्याचा अमीट सहभाग आहे.

‘वाडा चिरेबंदी’ने जेव्हा ही त्रयी आरंभ होते तेव्हा तिचे श्राव्य गतिमान, काहीसे आक्रमक, चपळ, आग्रही असते आणि युगान्त मध्ये ते अत्यंत धीमे, ठहराव असणारे होते. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत या तिन्ही नाटकांमध्ये प्रक्षुब्धतेचे, शांततेचे, ताणाचे, सहमती-असहमतीचे क्षण आहेत. परंतु ‘वाडा’मधली प्रक्षुब्धता आणि ‘युगांत’मधली प्रक्षुब्धता यांचा स्वभाव संपूर्णत भिन्न आहे. वाडामधली प्रक्षुब्धता त्यातल्या श्राव्यामुळे अधिकच प्रक्षुब्ध होते. युगांतमधली प्रक्षुब्धता त्यातल्या श्राव्याच्या ठहरावामुळे विलंबितात अनुभवाला येते. एकूणच नाटय़त्रयीच्या लयात्मक प्रवास, दृताकडून विलंबिताकडे झालेला आहे. आपण एखादी खयाल गायनाची मैफिल ऐकतो तेव्हा गायक आपल्याला विलंबिताकडून दृताकडे नेतो. ही नाटय़त्रयी आपल्याला दृताकडून विलंबिताकडे नेते. वाडा चिरेबंदीच्या आरंभी ‘रात्री साडेदहाची वेळ. शांतता चिरफाडत जाणारा दादीचा आवाज… आणि कुणा एका पुरुषाचा लयबद्ध घोरण्याचा आवाज.’ अशी रंगसूचना आहे. या दोन आवाजांनी रात्रीच्या सुन्न शांततेला तडा जातो आणि आवाजांची-कृतीची गतिमानता फुटल्यासारखी निर्माण होऊन नाटकभर संचारत राहते. रंजूचे मोठय़ाने फिल्म फेयर वाचणे, बाहेरून ऐकू येणारी शीळ, भास्करने उशाशी ठेवलेला पितळी डबा पडणे, अंधारातून अंजली-सुधीरचे धडपडणे असे परस्परविरोधी श्राव्य निर्माण होते. हे श्राव्य अर्थातच केवळ वैविध्यापोटी येत नाही. या श्राव्याच्या परस्परविरोधी आणि विसंगत स्वभावांमुळे नाटकात पुढे निर्माण होणाऱया नात्यांच्या-नीतिमत्तांच्या-स्वभावांच्या-भावस्थितींच्या-वृत्तींच्या-कृतींच्या टकरावांना विकसित होण्यासाठी एक आवार घडविले जाते. वाडा चिरेबंदी शेवटाकडे येते तेव्हा बुलडोझरची धडपड आणि मृत्यूनंतरच्या विधींचे मंत्र एकमेकात मिसळून ऐकू येतात. नाटकातला शेवटचा अंधार होतो तेव्हा ‘बुलडोझरची धडधड वाढते’ अशी रंगसूचना आहे. तात्याजींचा मृत्यू हा धरणगावकर-देशपांडेंच्या ध्वस्ततेचा आरंभबिंदू ठरतो. बुलडोझर त्यांच्या भौतिकाचाही ऱ्हास आरंभतो. संपूर्ण नाटकात भास्करचे घोरणे, चंदुकाकाचे कण्हणे, भास्करच्या मारहाणीने रंजूच्या किंकाळ्या-आरडाओरडा, अंजली-सुधीरचे दबक्या आवाजातले बोलणे अशी श्राव्ये निर्माण होत राहतात. नाटकाच्या दृकप्रत्ययातून जसा नाटकाचा नाटय़ानुभवाचा एक पोत घडतो, तसा पोत नाटकाच्या श्राव्यानुभवातूनही घडतो.

नाटय़त्रयी पराग-अभय साधारण 17-18 वर्षांचे असतात तेव्हा आरंभ होते आणि हे दोघे चाळीशीच्या उंबरठय़ावर असतात तेव्हा संपते. लौकिकदृष्टय़ा आणि जीवनबदलाच्या दृष्टीनेही हा काळ दीर्घ आहे. या दीर्घतेमुळे माणसांचे स्वभाव बदलतात, त्यांच्या बोलण्याचे लहेजे बदलतात. मग्न तळ्याकाठीमध्ये चांदणे-आकाशगंगा-जीवनाची असीमता, मानवी जीवनाची कःपदार्थता यांविषयी पराग बोलतो. या प्रदीर्घ संवादात काहीशी अधीरता आहे. नाटकात हा संवाद फक्त ऐकू येतो. प्रभा आणि चांदणे दिसतात. प्रभा अत्यंत अस्वस्थ हालचाली करत खोलीभर फिरते. खोलीबाहेर पडून दिंडीदरवाजापर्यंत जाऊन येते. अखेरीस शय्येवर पडते आणि तिचा प्राण जातो. परागच्या संवादाचे श्राव्य प्रभाच्या मृत्यूला अत्यंत व्याकुळ बनवते. हाच पराग, युगांतमध्ये पुन्हा चांदण्याविषयी बोलतो तेव्हा त्याच्या बोलण्यात अधीरता नाही शांतवणे आहे.

युगांत सुरू होताना आणि संपताना वाळवंटाने निःश्वास टाकल्याप्रमाणे वाटणारी बासरीची एक वाळवंटी धून ऐकू येते अशी रंगसूचना आहे. पराग आणि नंदिनीमधला दुरावा संपताना घंटानाद आणि शंखनाद ऐकू येतात. हेच घंटानाद आणि शंखनाद, चंदू आणि आई यांच्या अखेरच्या भेटीवेळीही ऐकू येतात. युगांतमध्ये, पार्श्वभूमीवर ऐकू येणारा हिंसक जमावाचा ओरडा, चंदुकाकाचा आकांत ऐकू येतो. अत्यंत ठायलयीत घडलेला अभय- परागचा दीर्घ संवाद ऐकू येतो. आणि या संवादाचा अनुभवात्मक आशयात्म उत्कर्ष घडवणारे, ‘आपणच उत्तर होऊन बसावं. मग कशाला पडतील प्रश्न!’ हे नंदिनीचे वाक्य ऐकू येते. एलकुंचवारांची ही नाट्यत्रयी मराठी नाटय़ेतिहासात अनेक अर्थांनी आणि अनेक अनुषंगांनी निर्णायक वळण ठरलेली आहे. तिच्यातून दिसणारा मूल्य ऱ्हास हा भविष्यवेधी ठरलेला आहे. तिच्यातून अनुभवास येणारी जीवनाची होरपळ आज आपण शब्दश अनुभवत आहोत. पराग आणि नंदिनीचे शहाणपण गाठीशी बांधून जसा अभय सिंथियाकडे जाणारी अनंत वाट चालायला लागतो आणि त्याचे हे वाट आक्रमणे परागचा मुलगा भग्न वाडय़ाच्या चौकटीत उभा राहून न्याहाळतो, तसे काहीसे आपल्यालाही करायचे आहे. युगांताचा आणि सुदूर युगारंभाचा हा तत्त्वगंभीर भाव साकारण्यात नाटय़त्रयीचे विलक्षण श्राव्य अनन्य योगदान देते हे मात्र निसंशय.

[email protected]

(लेखक नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)