अवलिया : सुधीरराव!

>>मंगेश उदगिरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

सुधीरराव अकोलकर या गृहस्थांचे माझ्या जीवनात जे स्थान आहे ते अढळ आहे. माझ्या आयुष्याला ज्या सुखद कलाटण्या मिळाल्या त्या यांच्यामुळेच. तसे ते माझे नातेवाईक. माझ्या ज्येष्ठ बंधूंचे मेहुणे, पण त्या पलीकडे जाऊन एक वेगळाच स्नेहबंध आमच्यात निर्माण झाला तो त्यांच्यामुळेच. त्याची सुरुवात एका प्रवासाने झाली. सुधीरराव पोलीस फौजदार. त्यांच्या नावाचा दबदबा होता. मी त्या वेळी जेमतेम मॅट्रिकला असेन. तसे पाहायला गेले तर माझ्या भावाचे त्यांच्याशी जे नाते होते, त्याच नात्याने मी त्यांच्याशी बांधला गेलो असलो तरी माझे वय, शिक्षण पाहता ते मला एकेरीच बोलायचे, थट्टा करायचे. पण तरीही मी त्यांना थोडा दबकूनच असायचो. ते दिसायला अत्यंत देखणे असले तरी त्यांच्या चेहऱयावर पोलिसी उग्रपणा पसरलेला असायचा. त्या वेळी ते उमरगा तालुक्यातल्या लोहारा गावात होते. एकेदिवशी आमच्या घरी निरोप आला,

“ त्याला पाठवून द्या,” पाठवून द्या म्हणणं सोपं होतं, पण कसं पाठवायचं? हा प्रश्न घरासमोर पडला. तिथे जायला एक बस होती ती उमरग्यापर्यंत होती. त्याअगोदर उतरायला याला जमेल का? हा प्रश्न सगळय़ांसमोर पडला होता.

“हे हेळवाक तसंच पुढं निघून गेलं तर पंचायत व्हायची.” असा सूर निघाला होता. कारण तोपर्यंत मी एकटय़ाने कुठे कधी गेलो नव्हतो. शेवटी जेव्हा सुधीररावांनी ती जबाबदारी स्वीकारली तेव्हा मला परवानगी मिळाली आणि मी लातूर-उमरगा बसमध्ये बसलो एकदाचा. एकटय़ाने केलेल्या त्या प्रवासाचे मला आजही अप्रूप वाटतं. खिडकीजवळ जागा मिळाली होती. बार्शी लाइट रेल्वेच्या मानाने हा प्रचंड वेगवान प्रवास होता. उघडय़ा खिडकीतून येणारा भन्नाट वारा. हिवाळय़ाचे दिवस त्यामुळे सगळीकडे हिरवाई दाटलेली. नजरेसमोरून झाडे पळत होती. मध्येच एखाद्या थांब्यावर बस थांबायची. काही उतरायचे, तर काही चढायचे. मला गंमत वाटू लागली होती. असा बराच वेळ गेल्यावर एका स्टॉपवर गाडी थांबली आणि गाडीत एक पोलिसमामा शिरले.

“ हितं उदगीरकर कोन हाय?” राठ आवाजात विचारणा झाली.
मी घाबरून गेलो. काय करावं सुचेना. कसाबसा उठून उभा राहिलो.
“ तुमी उदगीरकर काय?” त्यांची तीक्ष्ण नजर माझ्यावर रोखलेली.
“हो- होय.”
“चला.”
“कुठं?”
“लव्हाऱयाला उतरायचंय नव्हं?”
“ हो.”
“मग आलं की लव्हारा. उतरा, सायेब वाट बगत्यात तुमची.”
माझ्या लक्षात आलं. यांना सुधीररावांनी पाठवलं
असणार. मी सुटकेचा नि:श्वास टाकत उतरलो. घरी आलो. सुधीरराव, त्यांचे लहान भाऊ बाळासाहेब आणि ज्यांच्यावर भिस्त ठेवून आलो होतो त्या सुनंदाताई माझी वाटच पाहत होत्या. मला घेऊन आलेला कॉन्स्टेबल कडक सॅल्युट मारून निघून गेला.

“बरं झालं कॉन्स्टेबलला पाठवलं ते. काय उमरग्याला चक्कर मारायचा बेत होता की काय?” सुधीरराव गडगडाटी हसले. मी कानकोंडा होऊन गेलो. त्यांचे बंधू बाळासाहेब माझ्याच वयाचे. त्यांनी लगेच माझा ताबा घेतला. सुनंदाताईंनी सगळय़ांसाठी चहा केला.
“बसा आता, जेवणाची तयारी करते.”

“करा, करा. पाहुण्याला मस्त गोडधोड खाऊ घाला. मी येतो.” म्हणून सुधीरराव बाहेर पडले ते रात्रीच घरी आले. तोपर्यंत मी घरात रुळून गेलो होतो. त्यानंतरचे तीन दिवस माझी नुसती चंगळ चालली होती. सुधीरराव सकाळचा नाश्ता झाला की, ठाण्यावर जात ते दुपारच्या जेवणालाच येत. वैतागलेले असायचे. घरी आल्यावर थोडे स्थिरस्थावर झाले की, मूडमध्ये यायचे. जेवताना ते कधी छान ताक करायचे, तर कधी त्यांच्या आवडीची टमाटय़ाकांद्याची चविष्ट भाजी करायचे. ती इतकी चवदार असायची की, इतक्या वर्षांनंतरही ती चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.

हा माझा जसा पहिला एकटय़ाने केलेला प्रवास होता तसाच पहिला पोलिसी हिसका बघण्याचाही होता. त्याचे असे झाले की, एकदा सुधीरराव दुपारी गाढ झोपेत होते. तेवढय़ात दाराची कडी वाजली. मी जागाच होतो. उठून कडी काढली आणि दचकून बाजूला झालो. दारात हवालदार आणि मुसक्या बांधलेला एक दणकट उग्र चेहऱयाचा माणूस उभे होते.

“सायबांना बोलवा.”
मी आत जाऊन सुधीररावांना उठवले. ते चरफडत उठले. तोंडावर पाणी मारून बाहेर आले. या दोघांची वरात पाहात खुणेने जवळ बोलावले. जवळ आल्याबरोबर त्या बेरड माणसाच्या छातीत बक्क्न लाथ घातली. थोबाड फोडले आणि शांतपणे विचारते झाले.
“हा, आता काय गुन्हा केलाय याने?”

कसलीही चौकशी करण्याअगोदर दिलेली ही ट्रीटमेंट माझ्या मनावर कोरली गेली. त्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी त्यांना माहीत असली तरी मला कुठे माहीत होती?

त्यानंतरच्या काळात सुधीररावांशी माझा परिचय दाट होत गेला आणि या वरकरणी उग्र दिसणाऱया माणसाच्या सहृदयतेचे अनेक कंगोरे माझ्या ओळखीचे होत गेले हा भाग वेगळा. लोहाऱयावरून लातूरला निघालो तेव्हा “नीट उतरशील ना लातूरला? की, पाठवू कुणाला बरोबर?”

मला लाजल्यासारखं झालं. माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर असलं तरी का कुणास ठाऊक, माझ्यापाशी ते मन मोकळं करायचे. कधीतरी अचानक त्यांचा फोन यायचा, “जालन्याला ये.” मला जावंच लागायचं. साधारण सायंकाळी मी पोहोचायचो. रात्री जेवण झाल्यावर बाहेरच्या व्हरांडय़ात आम्ही बसायचो. बोलताना माझ्याकडे फक्त श्रोत्याची भूमिका असायची. त्यांच्या मनातली साचलेली ‘सल’ ते माझ्यासमोर मोकळी करायचे. माझ्या वाईट वाटण्याचे भाव माझ्या चेहऱयावर उमटत असावेत कदाचित. माहीत नाही, पण आम्हा दोघांमध्ये एक अनोखं मैत्र निर्माण झालं होतं जे शेवटपर्यंत टिकून राहिलं. आज सुधीररावांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा मी हळवा होऊन जातो. मिस यू सुधीरराव!
[email protected]