शक्तिरंग – शर्यत अजून सुरू आहे!

>> शिल्पा सुर्वे

ब्रेस्ट कॅन्सरशी लढणारी प्राची कुलकर्णी म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक

प्राची गानू-कुलकर्णी ही मूळची मुंबईची, पण सध्या दुबईत राहतेय. उत्तम शेफ आणि धावपटू असणाऱया प्राचीला वयाच्या 36 व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. प्राचीने हार मानली नाही. दोन्ही स्तन आणि दोन्ही ओव्हरी काढून टाकल्यानंतरही ती प्रचंड ऊर्जेने आयुष्य जगतेय. आपल्या करीअरमध्ये ती पुन्हा उभी राहिलेय. पराकोटीची सकारात्मता आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर प्राचीने ‘शर्यत अजून सुरू आहे’ हे दाखवून दिलेय.

विक्रोळी येथील प्राची कुलकर्णी 2014 पासून दुबईला राहतेय. तिथल्या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून काम करते. प्राची धावपटू आहे. तिने डिसेंबर 2019 मध्ये पुणे मॅरेथॉनमध्ये 21 किमी रन पूर्ण केली होती. दुबईतही तिने अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. असेच एका मॅरेथॉनची तयारी करत असताना तिला एका स्तनामध्ये गाठ असल्याचे जाणवले. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये बायोस्कोपी केल्यानंतर ती गाठ कॅन्सरची असल्याचे निदान झाले. तिचे उपचार सुरू झाले. तब्बल 16 केमोथेरपी, रेडिएशन या सगळय़ांतून तिला जावे लागणार होते. एक क्षण तिला वाटले आता सगळे संपले. शेफ असल्याने (किचन इन्चार्ज) दिवसभर 12 तास उभे राहून डय़ुटी करू शकत नाही. त्यातच केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स भयंकर होते. डायरिया, पाईल्स, जिभेवर फोड येणे, नखांची त्वचा फाटणे, तोंडाची चव जाणे अशा केमोथेरपीच्या साईड इफेक्ट्सला ती सामोरे जात होती. 16 केमोथेरपीचा टप्पा मोठा होता. एक धावपटू म्हणून प्राची या केमोथेरपीच्या सगळय़ा टप्प्यांकडे मॅरेथॉन म्हणून बघू लागली. प्राची सांगते, स्पर्धेतला धावपटू बाकी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. अजून मला किती अंतर कापायचे हा एकच विचार करतो. 16 केमोथेरपीकडे मी त्याच नजरेने बघू लागले. घरातल्या घरात वॉक सुरू केला. या आजाराला आपल्यावर स्वार होऊ द्यायचे नाही, हा निर्धार केला.

प्राचीला लहान वयात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे कारण म्हणजे शरीरातील जेनेटिक म्युटेशन. प्राचीच्या कुटुंबात आधी कुणाला ना कुणाला हा कॅन्सर झाला होता. उपचारानंतरही कॅन्सर पुन्हा उद्भव नये म्हणून प्राचीने दोन्ही ब्रेस्ट आणि ओव्हरीज काढण्याचा निर्णय घेतला.

करीअर सोडले नाही…

केमोथेरपीमुळे माझ्या जिभेची चव हरपली. मी शेफ असल्याने माझ्यासाठी चव खूप महत्त्वाची होती. सगळे करीअर संपले असे वाटले. मी रेसमधून बाहेर गेले या विचाराने दुःखी झाली, पण माझ्या नवऱयाने मला खूप मोलाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, लोकप्रिय संगीतकार आणि पियानोवादक बिथोवेन हा बहिरा होता. त्याचे शब्द प्रेरणा देऊन गेले. मी आज काम माझ्या करीअरमध्ये उभी आहे. प्राची आता पूर्वीसारखीच कुकिंग करतेय. ती मिडल ईस्टच्या ‘हिरो ऑफ द कीचन 2023’ ची मानकरी ठरली आहे.

– पाच वर्षांचा हा दीर्घ प्रवास अनेक ट्विस्ट आणि टर्नने भरलेला होता. शेवटच्या तीन केमोथेरपी शिल्लक असताना तर तिने नार्ंसग रुममध्ये चक्क मराठी, हिंदी गाण्यांवर डान्स केला. रेडिएशन उपचारादरम्यान तिने 17 किलोमीटरचा रनदेखील पूर्ण केला. प्राची म्हणते, तो आनंद शब्दांत सांगता येत नाही. आता मला कसलीच भीती वाटत नाही. आयुष्याचे पुढचे काही सांगता येत नाही. मी आता किकबॉक्सिंग, झुंबा सुरू केलेय.

रुग्णांना प्रेरणा

कॅन्सरवर उपचार सुरू असताना प्राचीने आपल्या भावना चित्रांच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली. तिला काय त्रास होतोय, तिचा दिवस कसा राहिला, याचे ती इलस्ट्रेशन करायची. प्राचीने अल जलिला फाऊंडेशनमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी आर्ट वर्कशॉप घेतले. रुग्णांनी व्यक्त व्हावे, त्यांच्या भावना मांडाव्या, हा तिचा उद्देश. अनेकांना ती जगण्याची प्रेरणा देत आहे. हॅट्स ऑफ प्राची! खरंच शर्यत अजून सुरू आहे!