शक्तिरंग – निराधार वृद्धांचा आधार, ‘स्मित’ फाउंडेशनच्या योजना घरत

>> शुभांगी बागडे

स्त्रीमधील माया, ममता हे तिच्यातील शक्तीचेच रूप. ही ममता समाजापुढे कसा आदर्श निर्माण करू शकते याचेच एक उदाहरण म्हणजे स्मित ओल्ड एज होम अॅण्ड केअर फाउंडेशनच्या संस्थापिका योजना घरत. निराधार, एकाकी, असहाय्य वृद्धांचा आधार बनलेल्या योजना यांची गेली 28 वर्षे ही अविरत सेवा सुरू आहे.

रस्त्याच्या कडेला आश्रय घेतलेले, रेल्वे स्थानकावर एकाकी आयुष्य जगणारे, सरकारी रुग्णालयात उपचार घेणारे आणि मुलांनी सांभाळण्याची जबाबदारी झटकल्याने निराधार झालेले वयोवृद्ध यांच्या उर्वरित आयुष्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी स्मित ओल्ड एज होम अॅण्ड केअर फाउंडेशन झटत आहे.

संस्थेच्या सर्वेसर्वा योजना घरत स्वतŠ मदर तेरेसा संस्थेत वाढल्याने आपोआपच सामाजिक जबाबदारीचे संस्कार त्यांच्यात रुजले. लहानपणीच वयोवृद्धांची सेवा करण्याची शिकवण मिळालेल्या योजना यांनी 1993मध्ये पालघरमधील बोईसर येथे सरावली गावात एका मंदिराच्या पडीक जागेवर वृद्धाश्रम सुरू केला. या गावातील अनेकांच्या देणग्या व योगदानातून त्यांचा हा वृद्धाश्रम सुरू राहिला. 1993 ते 2000 अशी आठ वर्षे या आश्रमात त्यांनी 150हून अधिक ज्येष्ठांचा सांभाळ केला. ज्येष्ठांची संख्या वाढू लागल्याने मंदिर समितीने काही ज्येष्ठांची जबाबदारी घेतली व योजनांचे कार्य नव्या जागेत स्थलांतरीत झाले. सुरुवातीला पालघरमधील वाडा येथे व पुढे पनवेलमध्ये त्यांनी संस्थेचे काम सुरू ठेवले.

नागरिकांना योग्य सेवासुविधा मिळावी यासाठी त्यांनी 2013मध्ये भिवंडीजवळच्या काल्हेर गावात अर्धा एकर जागेवर तीन मजली इमारतीत वृद्धाश्रम सुरू केला. इथूनच संस्थेच्या कामाला सुरुवात झाली. गेली 10 वर्षे स्मित वृद्धाश्रमात 100 वृद्धांचा सांभाळ केला जातो. या वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या खाण्याच्या वेळा, पथ्य सांभाळणे, त्यांची अंघोळ, स्वच्छता याबाबत काटेकोर राहणे यासोबत वेळप्रसंगी त्यांना भावनिक धीर देणे, त्यांच्या इच्छेनुसार वेगवेगळे उत्सव, कार्यक्रम राबविणे अशा सर्व पातळ्यांवर योजना व त्यांचे स्वयंसेवक तत्पर राहत या ज्येष्ठांची काळजी घेत असतात.

योजना सांगतात, प्रत्येक निराधार वृद्धाची स्वतंत्र गोष्ट, स्वतंत्र व्यथा आहेत. निराधार म्हणजे ज्याचं कुणीच नाही. परंतु अगदी पाच मुलांचे आईवडीलही मुलं सांभाळत नाहीत म्हणून इथे दाखल होतात तेव्हा फार वाईट वाटते. यावर उपाय म्हणून संस्थेद्वारे कौटुंबिक समुपदेशनही केले जाते.

– इथे स्वयंसेवक म्हणून काम पाहणारी तरुण मुलंमुली ही शेल्टर होममधून आली आहेत. 18 वर्षांनंतर शेल्टर होममध्ये राहता येत नाही. त्यांच्याकडे कमावण्याइतके पुरेसे काwशल्यही नसते. अशा मुलांना संस्थेत काम देऊन त्यांच्या पुढच्या आयुष्याची आबाळ होणार नाही हाच यामागे योजना यांचा हेतू आहे. एकाच वेळी समाजातील अनेक गरजूंसाठी अशा प्रकारे कार्य करणाऱया योजना यांचे कार्य खरोखरच स्तुत्य आहे.

– संस्थेकडून समाजात असे किती निराधार वृद्ध आहेत याची चाचपणी केली असता चिंताजनक स्थिती समोर आली. या सगळ्यांचा मी आधार बनू शकले नाही तरी काही निराधारांची सेवा तर नक्कीच करू शकते, या ध्यासापोटी आता ठाणे घोडबंदर रोड येथे आम्ही आगामी प्रकल्पाला सुरुवात केली आहे. मात्र हा आश्रम उभा राहण्यासाठी समाजाच्या मदतीची, पाठिंब्याची गरज आहे.