…म्हणून अल्पवयीन मुलं बिघडतात; कुटुंब नियोजनाचा अभाव, गरिबी, शिक्षणापासून वंचित, चुकीची संगत

>> आशिष बनसोडे

खेळण्याबागडण्याच्या, शिक्षणाची कास धरण्याच्या वयात बरीच अल्पवयीन मुलं नशेच्या आहारी जात आहेत. परिणामी त्यांच्याकडून कळत-नकळत  नको ते कृत्य होत असल्याने त्यांचे बालगृहात येण्याचे प्रमाण वाढत आहे. याची गंभीर दखल घेत बालनिरीक्षणगृहाच्या न्यायाधीश व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांनी आज स्वतः गोवंडी परिसरात जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करत अल्पवयीन मुलं चुकीच्या मार्गाला का लागतात याची कारणे जाणून  केली.

गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे या पट्टय़ातील अल्पवयीन मुलांमध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी त्यातून त्या मुलांकडून नको ते कृत्य होत असल्याने त्यांचे बाल व निरीक्षणगृहात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. मानखुर्द, ट्रॉम्बे या भागात अशी काय समस्या आहे की तेथील मुलांकडून नको ते प्रकार घडतात, ते नशेच्या आहारी जातात, या विचाराने बालनिरीक्षणगृहाच्या न्यायाधीश व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यायचे ठरवून आज बालनिरीक्षणगृहाच्या न्यायाधीश यशश्री मारूळकर, रूपाली पाटील, मुंबई जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख, मुंबई उपनगर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे, सरकारी वकील रूपाली घोटवाल, ग्लोबल केअर फाऊंडेशनचे अबिद यांनी आज मानखुर्द मंडाला आणि ट्रॉम्बे परिसरात धडक दिली. या सर्वांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली असता अनेक समस्या निदर्शनास आल्या. आयुष्याच्या जडणघडणीच्या वयात ही मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहाचा रस्ता का भरकटतात याचे जळजळीत वास्तव त्यांच्या समोर आले. एका दाम्पत्याला पाच ते सहा अपत्ये, गरिबी, रोजगारासाठी घराबाहेर जावे लागत असल्याने मुलांकडे होणारे दुर्लक्ष, शिक्षणाचा प्रचंड अभाव यामुळे तेथील अल्पवयीन मुलं बिघडत असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

विद्यार्थ्यांशी संवाद

ट्रॉम्बे येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांशी यावेळी न्यायाधीश व प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. समाजमाध्यमांपासून का दूर रहावे, चांगले नागरिक बनण्यासाठी काय करावे याबाबत विद्यार्थ्यांना कानमंत्र देण्यात आला. यावेळी मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी, निरीक्षक गरुड, परिसरातील समाजसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी….

गोवंडीसारख्या झोपडपट्टी असलेल्या ठिकाणी राहणाऱ्यांमध्ये कुटुंब नियोजनाचा मागमूस नाही, परिणामी हव्या तितक्या अपत्यांना जन्म दिला जातो. त्यात कमालीची गरिबी, मग त्या सर्वांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालकांना रोजगारासाठी घराबाहेर जावे लागते, त्यामुळे मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष होते, मुलं हुशार आहेत, पण शिक्षणापासून दूर असल्याने ते नको त्या संगतीला लागतात. मग नशेच्या आहारी जाऊन त्यांच्याकडून नको ते घडते. या समस्या प्रामुख्याने सोडविण्याची काळाजी गरज आहे. जर कुटुंब नियोजन केले तर उर्वरित समस्या दूर होतील आणि मुलांना आवश्यक शिक्षण घेता येईल, त्यातून ते जबाबदार नागरिक बनतील, असे न्यायाधीश यशश्री मारूळकर व रूपाली पाटील यांनी सांगितले. मंडाला परिसरात शिक्षणाबाबत गंभीरताच नसल्याचे गंभीर चित्र दिसले. हे चित्र पालटणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.